पाथरे : कोरोनामुळे येथील खंडोबा महाराज यात्रोत्सव यंदा बंद ठेवण्यात आला असला तरी धार्मिक विधी शासनाच्या नियमात पार पडणार आहेत. पाथरे येथील यात्रोत्सव हा सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठा यात्रोत्सव म्हणून ओळखला जातो. या काळात गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने कोरोना संसर्ग फैलावू शकतो, या कारणास्तव यात्रोत्सव बंद ठेवला आहे. अनेक भाविकभक्त यांना खंडोबा महाराज यांचे फक्त दर्शन घेता येऊ शकते. यावेळी धार्मिक कार्यक्रम अतिशय मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी शासनाने तसेच पोलीस प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन काटेकोरपणे करावे लागणार आहे. या वर्षीचा यात्रोत्सवाचा मान आवर्तन पद्धतीने वारेगावकरांना मिळणार होता. परंतु कोरोनाकाळामुळे हा मान मिळू शकणार नाही, याची खंत वारेगावकरांना आहे. खंडोबा महाराजांचे मैदान वेगवेगळ्या दुकानांनी आणि गर्दीने फुलून जाते. अनेक वर्षांपासून चालत असलेल्या या यात्रा उत्सवात पहिल्यांदाच खंड पडला आहे. यात्रा उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे छबिना, तकतराव (देवाचा गाडा), कावडी, डफाच्या तालावर नृत्य करणारे ग्रामस्थ, खंडोबा महाराजांच्या पादुका आणि मुकुट मिरवणूक, खंडोबा महाराज पालखी सोहळा आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत असतात. यासाठी बाहेरगावी स्थायिक झालेले पाथरे येथील नागरिक, भाविकभक्त, पाहुणे, नातलग, मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात यात सहभागी होत असतात. चालू वर्षाचा यात्रोत्सव कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने अनेक व्यावसायिक, भाविकभक्त, ग्रामस्थ या यात्रोत्सवास मुकणार आहेत.
कोरोनामुळे पाथरे यात्रोत्सवाची परंपरा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 4:10 AM