वाके : मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक संचारबंदी असल्याने विनाकारण घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर मिशन बिगेनअंतर्गत सर्वकाही पूर्वपदावर आले असता आता पुन्हा पाच एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे नातेसंबंधात दुरावा आल्याचे अनुभवयास येत आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकमेकांपासून दूर राहाणे गरजेचे आहे. कोरोनाने सर्वांनाच जीवन कसे जगावे हे शिकवून दिले. या भयानक वैश्विक महामारीने सर्वच चालते बोलते व्यवहार ठप्प झाले. एवढेच नाही तर नातेवाईक, शेजारी, मित्र परिवार यांच्यापासून दूर केले. आमच्या घरी येऊ नका, असे म्हणण्याची वेळ या कोरोनाने सर्वांवर आणली आहे. यामुळे जवळच्या नाते संबंधात दुरावा निर्माण झाला आहे. भारतीय संस्कृतीत दैनंदिन जीवनात आदर - सत्कार करताना नमस्कार करण्याची प्रथा आहे. तसेच घरात आलेला पाहुणा देव समजून यथोचित पाहुणचार करण्याची परंपरा आहे. मात्र, या कोरोनामुळे जुन्या काळातील सर्व पध्दतींचा विसर पडू लागला आहे. घरातच राहाणे, दार बंद करून राहाणे, तोंडाला रुमाल बांधून एकमेकांसोबत बोलणे, मास्क आणि बांधलेला चेहरा यामुळे ओळख असूनही अनोळख्यासारखे राहाणे, दूरूनच मान हलवत नमस्कार घेणे, असे प्रकार सध्याच्या परिस्थितीत पाहावयास मिळत आहेत. सगळ्यांच्या मनात एकमेकांविषयी असणारी आपुलकी कोरोनामुळे कमी होतांना दिसत आहे. आपल्या जवळचे नातेवाईकसुध्दा घरी येऊ शकत नाहीत. कोरोना महामारीमुळे नातेसंबंधात दुरावा निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.