नाशिक : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जुने नाशिकमधील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्गा शरीफचे प्रवेशद्वार रविवारपासून (दि.२२) येत्या ३१ तारखेपर्यंत बंद राहणार असल्याचे विश्वस्त मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. दर्ग्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर तसा फलकदेखील लावण्यात आला आहे. भाविकांनी दर्शनासाठी दर्ग्याच्या परिसरात गर्दी करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. आपआपल्या घरीच फातेहा व दुवा पठण करण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाकडून करण्यात आले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलम १४४ लागू करत राज्य लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे रविवारी रात्री ‘शब-ए-मेराज’ या पवित्र रात्रीदेखील मशिदींमध्ये गर्दी होऊ शकली नाही. नागरिकांनी टप्प्याटप्प्याने येऊन नमाजपठण करुन आपआपले घर गाठले. दरम्यान, कुठल्याही दर्गांवरदेखील भाविकांनी दर्शनासाठी टाळले. जुने नाशिकमधील बडी दर्गासह, आनंदवली येथील हजरत पीर सय्यद हसन रांझेशाह बाबा यांचाही दर्गा दर्शनासाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी दिली. नागरिकांनी धार्मिक स्थळांवर अनावश्यकरित्या गर्दी करणे टाळावे, जिल्हा प्रशासनासह दर्गा विश्वस्त मंडळांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. संबंधित दर्गांमधील मुतवल्ली, मुजावर हेच नियमितपणे फातेहापठण करतील, त्यांच्याव्यतिरिक्त कोणीही दर्गामध्ये दर्शनासाठी हजेरी लावू नये, असेही त्यांनी सांगितले. बडी दर्गाच्या प्रवेशद्वारावर बाहेरूनच काही भाविकांनी येऊन ‘कोरोना’ आजारापासून संपुर्ण देश सुरक्षित व्हावा, यासाठी दुवा केली.