नाशिक : महिनाभरापुर्वी शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्वच पोलीस ठाण्यात चेनस्नॅचर्स, घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांनी हैदोस घातला होता. कोरोनामुळे देश आणि राज्य संकटात सापडताच हळुहळु नाशिककरदेखील आपआपल्या घरात बंदिस्त झाले आणि जनता कर्फ्यूपासून अचानकपणे शहराची गुन्हेगारीदेखील ‘लॉकडाऊन’ झाली. सर्वच पोलीस ठाण्यांमधील गुन्ह्यांची संख्या झपाट्याने कमी झाली. एकूणच जे शहर पोलिसांना शक्य झाले नाही, ते ‘कोरोना’ने करुन दाखविले, अशी चर्चाही एकीकडे शहरात सुरू आहे.शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण एकाएकी कसे कमी झाले? कोठेही सोनसाखळी चोरी नाही, की घरफोडीसुध्दा नाही? सगळे कसे ‘लॉकडाऊन’ यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे कोरोनाची धास्ती. नागरिक घर सोडत नाही, त्यामुळे सध्या कोणतेही घर बंद नाही आणि गुन्हेगारदेखील घराबाहेर पडत नाही. कारण पोलिसांची गस्तही तितकीच आणि ठिकठिकाणी नाकाबंदीसुध्दा, आणि पर्यायाने कोरोनाची धास्तीही. या सर्व कारणांमुळे शहराची गुन्हेगारी आटोक्यात आल्याची स्थिती मागील काही दिवसांपासून पहावयास मिळत आहे. कोरोनाची धास्ती पसरली आणि गुन्हेगारी गायब झाली, अशी चर्चाही नागरिकांमध्ये होऊ लागली आहे. कोरोनामुळे घरातच थांबण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे. संपुर्ण शहर लॉकडाऊन झाले आहे. मंदिर, मशिद, दर्गा, मार्केट, मॉल्स सर्व काही बंद आहे, यामुळे रस्त्यांवर वर्दळही नाही, परिणामी दुचाकी चोरीचे प्रमाणसुध्दा कमालीचे घटले आहे. तसेच महिलाही घराबाहेर पडत नसल्यामुळे सोनसाखळी चोरीही आटोक्यात आली आहे. घरफोड्यांचे सत्रदेखील जवळजवळ थांबले आहे. यामुळे शहर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सध्या शहर पोलिसांना केवळ आणि केवळ रस्त्यांवर विविध उपनगरांमध्ये नागरिकांची गर्दी जमणार नाही, याकडे अधिक लक्ष देण्याखेरिज दुसरे कोणतेही काम महत्त्वाचे नाही. नागरिकांची गर्दी आटोक्यात आणणे, अत्यावश्यक अपात्कालीन स्थितीत नागरिकांना मदत पुरविण्याकडे पोलीस प्रशासन अधिक लक्ष देत आहे. प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदीची ठिकाणे वाढविण्यात आली आहे.सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्याची संधीसोनसाखळी चोरी, घरफोड्या, दुचाकी चोरी करणारे सराईत गुन्हेगार जे पोलिसांना वारंवार गुंगारा देत होते, त्यांना बेड्या ठोकण्याची ही अचूक संधी आहे. कारण गुन्हेगार आता शहर काय तर घरदेखील सोडू शकत नाही. यामुळे पोलिसांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून गुन्ह्यांची उकल करणे सोपे होणार आहे.
धसका कोरोनाचा : शहरातील गुन्हेगारही ‘लॉकडाऊन’; गुन्ह्यांच्या प्रमाणात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 2:33 PM
मंदिर, मशिद, दर्गा, मार्केट, मॉल्स सर्व काही बंद आहे, यामुळे रस्त्यांवर वर्दळही नाही, परिणामी दुचाकी चोरीचे प्रमाणसुध्दा कमालीचे घटले आहे. तसेच महिलाही घराबाहेर पडत नसल्यामुळे सोनसाखळी चोरीही आटोक्यात आली आहे. घरफोड्यांचे सत्रदेखील जवळजवळ थांबले आहे.
ठळक मुद्देप्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदीची ठिकाणे वाढविण्यात आली सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्याची संधीघरफोड्यांचे सत्रदेखील जवळजवळ थांबले