नाशिक: देशभरासह नाशिकमध्ये पुढील महिन्यापासून होणाऱ्या जनगणनेवरही कोरोनाचे संकट असून, या प्रक्रियेत अनेक प्रकारच्या अडचणी येण्याची शक्यता आहे. महापालिकेकडे शहरी भागाची जबाबदारी असली तरी जनगणनेसाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे आउटसोर्सिंगद्वारे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
देशात दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. यापूर्वी दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०११ मध्ये जनगणना करण्यात आली होती. त्यावेळी शहराची लोकसंख्या १० लाख ८६ हजार ५३ इतकी नोंदवली गेली होती. यंदा एप्रिल महिन्यापासून देशभर जनगणना करण्यात येणार आहे. देशाच्या आर्थिक आणि अन्य धोरणांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली ही जनगणना करताना यंदा लोकसहभागातून जनकल्याण अशी थीम असणार आहे. महापालिका क्षेत्रातील जनगणनेसाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांची प्रधान जनगणना अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय शासनकडूनच कर उपायुक्त राहुल चौधरी आणि समाजकल्याण उपायुक्त अर्चना तांबे यांची मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ४८ फिल्ड ट्रेनर नियुक्त करण्यात येणार असून, त्यांना प्रशिक्षणाची जबाबदारी चौधरी आणि तांबे यांची असणार आहे. फिल्ड ट्रेनरच्या अधिपत्याखाली ३ हजार ५०० प्रगणक नियुक्त केले जाणार असून, त्यांच्यामार्फत जनगणना होणार आहे.
पहिल्या टप्प्यात एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान प्रगणक घरोघर जाईल आणि घरांची सूची आणि व्यक्तींची संख्या नोंदवतील. दुसरा टप्पा ९ ते २८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान होईल यात अंतिम जनगणना होणार आहे. तथापि, सध्या कोरोनाचे सावट असून ते एप्रिलपर्यंत लांबल्यास एकूणच जनगणनेची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.