नाशिक : कोरोना संकटकाळात मुक्त शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, बदलत्या काळाची पावले ओळखून शिक्षणाची ही गंगा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ३२ व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, वित्त अधिकारी संजय कुबल उपस्थित होते. प्रा. ई. वायुनंदन म्हणाले, विद्यापीठाच्या एम.ए. मराठी, एम.ए. उर्दु, एम.ए. लोकप्रशासन, एम.एस्सी.च्या विविध विषयांसह विविध पदव्युत्तर शिक्षणक्रमांना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वदूर असलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. विद्यापीठाने घेतलेल्या ऑनलाईन परीक्षा यशस्वी झाल्या असून, नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून मुक्त संवाद साधण्यात विद्यापीठ यशस्वी झाल्याचेही त्यांनी नमूद केले. तत्पूर्वी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमात कुलगुरूंच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यापीठ आवारातील यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून विद्यापीठ ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान, विद्यापीठ आवारात वर्धापनदिन व वनदिनाचे औचित्य साधत वृक्षारोपणही करण्यात आले.
010721\01nsk_25_01072021_13.jpg
वर्धापन दिना कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कुलगुरू प्रा. इ वायूनंदन. समवेत डॉ. दिनेश भोंडे, संजय कुबल, डॉ. जयदीप निकम, डॉ. धनंजय माने, नागार्जुन वाडेकर,डॉ. प्रकाश देशमुख, डॉ. मधुकर शेवाळे आदी.