मनमाड, नांदगाव शहर व तालुक्यातील ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आल्याने, नांदगांव तालुका हा कोरोना हॉटस्पॉट बनला होता. स्थानिक आमदार सुहास कांदे यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्याशी वारंवार बैठक घेऊन उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन व सूचना केल्या. तालुक्यातील प्रशासनानेही अहोरात्र काम करून रुग्णांची काळजी घेत रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
त्यामुळे रोहिले बु, माणिकपुंज, जवळकी, वसंतनगर, पोही, गणेशनगर, ढेकू बु, वेहेळगांव, आमोदे, बोराळे, मळगांव, गिरणा डॅम, अस्वलदरा, लोहशिंगवे, मोहेगांव, बेजगांव, वंजारवाडी, सटाणे , अनकवाडे, एकवई, कऱ्ही, माळेगांव क., घाडगेवाडी, नारायणगांव, मांडवड, आझादनगर, लक्ष्मीनगर, खादगांव, नवसारी, पांझणदेव, धोटाणे बु. धोटाणे खु, हिसवळ खु, हिसवळ बु, पानेवाडी, कोंढार, धनेर, वाखारी, पिंप्राळे, पारेकरवाडी, नांदुर, बोयेगांव चिंचविहीर, जळगांव खु. बाभुळवाडी, श्रीरामनगर, मल्हारवाडी, बाणगाव खु, बाणगांव बु, खिर्डी, भौरी, वडाळी खु, सोयगांव, दहेगांव, फुलेनगर, क्रांतिनगर आदी ५८ गांवे कोरोना मुक्त झाली आहेत.
तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मुख्यमंत्र्याच्या आवाहनाला साथ देत, अनेक उपक्रम राबविले. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेल्वे कम्युनिटी हॉल मनमाड येथे ३० बेडचे कोविड सेंटर व उपजिल्हा रुग्णालय मनमाड येथे ३० बेडचे कोविड सेंटर सुरू करून, कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. ग्रामीण रुग्णालय नांदगाव, उपजिल्हा रुग्णालय मनमाड या दोन्ही रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचीच फलश्रुती म्हणून नांदगावचे तहसीलदार उदय कुलकर्णी, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.ससाणे, मनमाड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.नरवणे, ग्रामीण रुग्णालय नांदगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रोहन बोरसे, सर्व परिचारिका, कर्मचारी, पोलीस प्रशासन या सर्वांच्या सहकार्याने नांदगाव तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे.
इन्फो
ऑक्सिजन प्रकल्प मंजूर
नांदगाव मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय नांदगाव व उपजिल्हा रुग्णालय मनमाड यांना १०० ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले, तसेच १० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर व दोन ड्युरा सिलिंडरही उपलब्ध करून देण्यात आले. आमदारांच्या प्रयत्नातून शिवसेना पक्षातर्फे ग्रामीण रुग्णालय नांदगाव व उपजिल्हा रुग्णालय मनमाडसाठी ६ व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय मनमाड व ग्रामीण रुग्णालय नांदगाव या दोनही रुग्णालयांसाठी ऑक्सिजन प्लँट मंजूर करण्यात आले, तसेच सर्व ग्रामपंचायतींना व नांदगाव, मनमाड नगरपरिषद यांना सॅनिटायझर उपलब्ध करून देणे, आशासेविकांना पीपीई किट वाटप करणे, असे अनेक उपक्रम राबवून कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न झाले.