शैलेश कर्पे
सिन्नर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत नागरिकांमध्ये भीती जास्त होती. पण दुसऱ्या लाटेनंतर नागरिकांमधील कोरोनाबद्दलचे भय संपल्याने कोरोना अजून पूर्णपणे संपला नसल्याचे चित्र सिन्नर, निफाड व मालेगाव तालुक्यात पाहायला मिळत आहे. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीकडे कानाडोळा केल्याचे चित्र आहे. त्यामुळे या तीन तालुक्यांत कोरोनाने आपला मुक्काम वाढविल्याचे दिसून येते. नाशिक जिल्ह्यात दुसऱ्या लाटेनंतर कोरोना रुग्णांची संख्या वेगाने कमी झाली आहे. नाशिक शहरात तर अतिशय कमी प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत असले तरी, नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या पाहिजे त्या प्रमाणात थांबली नसल्याचे चित्र आहे.
सिन्नर तालुक्यात आजही ८४ रुग्ण कोरोनाबाधित असून त्यांच्यावर सिन्नर ग्रामीण रुग्णालय व इंडिया बुल्स कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यात सिन्नर शहरातील ७, तर जिल्हा परिषद हद्दीतील म्हणजे ग्रामीण भागातील तब्बल ७७ रुग्ण आहेत. अनलॉकनंतर ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोना उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात काही गावांमध्ये आठवडे बाजार बंद असले तरी, गुजरीच्या किंवा भाजीपाला बाजाराच्या नावाखाली मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामात शेतीची कामे सुरू असल्यानेही वर्दळ वाढली आहे. दुकानांच्या वेळा वाढल्याने सिन्नरसह ग्रामीण भागात बाजारपेठेत गर्दी होत आहे. अनेकांनी रुमाल किंवा मास्कचा वापर करणे बंद केल्याने जोखीम वाढली आहे. बाजारपेठेत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुसाट सुटल्या असून प्रवाशांकडून नियमांचे पालन केले जात नाही. मास्क वापरला जात नाही. बसमध्ये चढ-उतार करताना गर्दी केली जाते. शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने बसला गर्दी वाढली आहे. सार्वजनिक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले जात नाही. विवाहसोहळे व अन्य कार्यक्रमांना नागरिकांकडून गर्दी केली जात आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नसल्याने कोरोना रुग्णांची संख्या पाहिजे त्या प्रमाणात कमी होत नसल्याचे चित्र आहे. त्यातच गेल्या महिन्यात स्वॅब घेतलेल्या १५ रुग्णांना डेल्टा प्लस असल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र याचा अहवाल एक ते दीड महिन्यापूर्वीचा असल्याने व ते रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने संकट कमी झाले आहे. आरोग्य विभागाकडून टेस्टिंग केली जात असल्याने रुग्णसंख्येत वाढ दिसून येत असल्याचेही सांगितले जात आहे. आरोग्य विभागाने रुग्ण ट्रेसिंगवर भर दिला आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी केली जात आहे. सिन्नर तालुक्यात लसीकरणानेही वेग घेतला आहे. आतापर्यंत तालुक्यातील ८५ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
-----------------------
सिन्नर तालुक्यात बाजारपेठेची गावे जास्त आहेत. जनतेचा नाशिक, अहमदनगर, पुणे व औरंगाबाद या लगतच्या जिल्ह्यांसोबत संपर्क येतो. शेतीच्या कामांमुळे नागरिक बाहेर पडत आहेत. टेस्टिंग सुरूच आहेत. त्यामुळे रुग्णवाढ दिसते. लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी व बाधित आढळल्यानंतर ताबडतोब ट्रेसिंग केले जात आहे.
- डॉ. मोहन बच्छाव, वैद्यकीय अधिकारी, सिन्नर
फोटो ओळी-
सिन्नर बसस्थानकावर प्रवासी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गर्दी.
(१० सिन्नर ३)
100821\10nsk_15_10082021_13.jpg
१० सिन्नर ३