पाथरे: येथील खंडोबा महाराज यात्रोत्सव या वर्षी बंद ठेवण्यात आला आहे. धार्मिक विधी शासनाच्या नियमात पार पडणार आहे.
पाथरे येथील यात्रोत्सव हा सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठा यात्रोत्सव म्हणून ओळखला जातो. या वर्षी हा यात्रोत्सव कोरोना काळ असल्याने बंद ठेवण्यात आला आहे. या काळात गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने कोरोना संसर्ग फैलावू शकतो या कारणास्तव यात्रोत्सव बंद ठेवला आहे. अनेक भाविक, भक्त यांना खंडोबा महाराज यांचे फक्त दर्शन घेता येऊ शकतात.यावेळी धार्मिक कार्यक्रम अतिशय मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी शासनाने तसेच पोलीस प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन काटेकोरपणे करावे लागणार आहे. या वर्षीचा यात्रोत्सवाचा मान आवर्तन पद्धतीने वारेगाव करांना मिळणार होता. परंतु कोरोना काळामुळे हा मान मिळू शकणार नाही याची खंत वारेगावकरांना आहे. दत्त जयंती पासून सुरु होणारा हा यात्रोत्सव साधारणपणे आठवडाभर चालतो. यात्रोत्सवात लाखो रुपयांची उलाढाल होत असते. परंतु कोरोना माहमारी मुळे अनेक व्यावसायिकांना याची झळ सोसावी लागणार आहे. यात्रेनिमित्त येणारे तमाशा मंडळे, रहाट पाळणे, मिठाई, खेळणी, खाऊची दुकानेवेगवेगळ्या प्रकारची दुकाने, आदींवर बंदीचा विपरीत परिणाम होऊन व्यावसायिकांचा व्यवसाय बुडणार आहे.या काळात कुस्त्यांची मोठी दंगल होत असते. यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून, राज्यांमधून कुस्तीगीर येतात परंतु ग्रामीण भागातील या खेळचा आनंद घेता येणार नाही. पाथरे यात्रोत्सवाचे उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे तमाशा. तमाशा शौकिनांचाही यावेळी हिरमोड होणार आहे. खंडोबा महाराजाचे मैदान वेगवेगळ्या दुकानांनी आणि गर्दीने फुलून जाते. अनेक वर्षापासून चालत असलेल्या या यात्रा उत्सव आला पहिल्यांदाच खंड पडला आहे.
यात्रा उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे छबिना, तकतराव ( देवाचा गाडा ), कावडी, डफाच्या तालावर नृत्य करणारे ग्रामस्थ, खंडोबा महाराजांच्या पादुका आणि मुकुट मिरवणूक, खंडोबा महाराज पालखी सोहळा आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत असतात. यासाठी बाहेर गावी स्थायिक झालेले पाथरे येथील नागरिक, भक्त, भाविक,पाहुणे, नातलग, मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात यात सहभागी होत असतात. चालू वर्षाचा यात्रोत्सव कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने अनेक व्यवसायिक, भाविक भक्त, ग्रामस्थ या यात्रोत्सवास मुकणार आहे.