नाशिकमध्ये दरवर्षी उत्तर भारतीयांसोबतच समाजातील विविध घटकांकडून होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन सण साजरा करत विविध रंगांची उधळण केली जाते. मात्र, यावर्षी नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातच राहून हा सण साजरा केला. विशेष म्हणजे ज्या कुटुंबांनी घरात सण साजरा केला त्यांनीही पाण्याचा वापर न करता कोरड्या रंगांचा वापर केला. सातपूर परिसरातील अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर भागात उत्तर भारतीय मोठ्या संख्येने वास्तव्याला आहेत. हिंदी प्रसारिणी सभा आणि नवदुर्गामाता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमिकनगर येथील दुर्गा मंदिरात दरवर्षी रंगांची उधळण केली जाते. कारखान्यात व अन्य ठिकाणी काम करणारे कामगार, व्यावसायिक एकत्र येऊन या रंगोत्सवात सहभागी होेतात. त्याचप्रमाणे घरीच तयार केलेले खास उत्तर भारतीय खाद्यपदार्थ भुजिया, मालपोहा, गुलाबजाम, करंजी, शेवयीखीर यांसह विविध पदार्थांचे वाटपही केले जाते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे सर्वांनी घरात राहून अथवा आपल्या अगदी जवळच्या परिचितांसोबत होळीचा उत्सव साजरा केल्याने यावर्षीचा होळीचा रंग फिका पडल्याचे दिसून आले.
कोरोनामुळे धुळवडीचा रंग पडला फिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 4:11 AM