नाशिक : जिल्ह्यात कोविडबाधित पहिला रुग्ण कोरोनामुक्त होण्याच्या घटनेला ८ महिने पूर्ण होत असताना रविवारी (दि. १३) एक लाखावर रुग्णदेखील कोरोनामुक्त झाले आहेत. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्णवाढीनंतर डिसेंबरच्या मध्यापर्यंत बाधित आणि कोरोनामुक्तीचे प्रमाण जवळपास समान पातळीवर आले आहे. त्यामुळे कोरोनाची वाटचाल आता भीतीच्या छायेतून बाहेर पडू लागल्याचे चित्र नागरिकांसाठी दिलासादायक आहे.
नाशिक जिल्ह्यात पहिला रुग्ण २९ मार्चला आढळल्यानंतर त्याच्यावर पूर्ण उपचार करून तसेच पुन्हा दोन वेळा चाचण्या करून खातरजमा झाल्यानंतर त्याला १४ एप्रिलला जिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. या पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाला जिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्याचा सोहळा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत पार पडला होता. त्या घटनेला सोमवारी (दि. १४) बरोबर ८ महिने पूर्ण होत आहेत. आठ महिन्यांच्या कालावधीत बाधित आढळून आलेल्या १ लाख ५ हजार ११४ रुग्णांपैकी १ लाखावर रुग्ण काल पूर्णपणे बरा होऊन घरी परतला आहे.
इन्फो
रुग्णांची कोराेनातून मुक्तता
रुग्णांची कोरोनामधून मुक्तता होण्यास १४ एप्रिलला प्रारंभ झाल्यापासून प्रारंभीचा १० हजार कोरोनामुक्ततेचा टप्पा गाठण्यास साडेतीन महिन्यांचा कालावधी म्हणजे २९ जुलैचा दिवस उजाडला होता. त्यानंतर २० हजार कोरोनामुक्ततेचा टप्पा २० दिवसात म्हणजेच १८ ऑगस्टला पूर्ण झाला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात तर ३० हजार (१ सप्टेंबर), ४० हजार (१२ सप्टेंबर), ५० हजार (१९ सप्टेंबर) तर ६० हजारांचा टप्पा २५ सप्टेंबरला पूर्ण झाला. त्यानंतर ७० हजारचा कोरोना मुक्ततेचा टप्पा ५ ऑक्टोबरला, ८० हजारांचा टप्पा १७ ऑक्टोबरला तर ९० हजाराचा कोरोनामुक्ततेचा टप्पा ५ नोव्हेंबरला गाठला गेला होता. त्यानंतर रविवारी कोरोनामुक्त रुग्णसंख्येने १ लाखाचा महत्वाचा टप्पा पार केला.
इन्फो
तरीही दक्षता आवश्यक
नाशिकमध्ये कोरोनामुक्ततेचे प्रमाण अत्यंत चांगले असून, नवीन बाधित आढळण्याचे प्रमाणही आटोक्यात येऊ लागले आहे. हे चित्र दिलासादायक वाटत असले तरीही नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक असून, अजून काही महिने तरी मास्क, सॅनिटायजेशन, सुरक्षित अंतराचे सर्व नियम कसोशीने पाळायला हवे.
डॉ. अनंत पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी