नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि. २) एकूण १०८६ नवीन रुग्ण बाधित झाले असून, २३८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात एकूण ६ बाधितांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८८२४वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या गत तीन दिवस सातत्याने कोरोनामुक्तपेक्षा कमी राहात असल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच उपचारार्थी रुग्णसंख्येतही सातत्याने घट येत आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्या १२ हजार १४२वर पोहोचली आहे. त्यात नाशिक मनपा क्षेत्रातील ७९४३, नाशिक ग्रामीणचे ३८०९, मालेगाव मनपाचे १६८, तर जिल्हाबाह्य २२२ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या १४७६ वर पोहोचली आहे. त्यात ११९७ अहवाल नाशिक ग्रामीणचे, १५६ नाशिक मनपाचे, १२३ मालेगाव मनपाचे अहवाल प्रलंबित आहेत, तर जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट २२.४१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यात नाशिक मनपाचे २६.७१ टक्के, नाशिक ग्रामीणचे १३.४० टक्के, मालेगाव मनपाचे १२.९६ टक्के, जिल्हा बाह्यचे ५२.१७ टक्के असा आहे, तर जिल्ह्यातील कोरोनामुक्ततेच्या दरात अल्पशी वाढ होऊन ते प्रमाण ९५.५३ टक्के झाले आहे. त्यात नाशिक मनपा ९५.५५ टक्के, नाशिक ग्रामीण ९५.३५ टक्के, मालेगाव मनपा ९६.१६ टक्के, जिल्हाबाह्य ९५.५९ टक्के इतके आहे.
इन्फो
आठवडाभर सातत्याने मृत्यू वाढ
जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनापर्यंत एक किंवा दोन इतकीच रोजची मृत्युसंख्या होती. मात्र, २७ जानेवारीपासून त्यात वाढ होऊन ती संख्या सातत्याने ५च्या आसपास किंवा त्यापेक्षा अधिक राहिली आहे. अशा परिस्थितीत आता बळींच्या संख्येला अटकाव करणे हेच प्रशासनापुढील मुख्य आव्हान आहे.