नाशिक : नाशिक शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून, त्यातून शासकीय कार्यालयेही सुटलेली नाहीत. नागरिकांचा सर्वाधिक वावर असलेल्या जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये दरररोज कोरोनाबाधित रूग्ण सापडू लागले असून, त्यातून मोठा धोका निर्माण झाला आहे. बायोमेट्रिक हजेरी, फाईलींचा प्रत्येक टेबलावरून होणारा प्रवास व हाताळणी त्याचबरोबर अभ्यागतांचा कोरोनाविषयक पुरेशी काळजी न घेता, सर्वत्र असणारा वावर या गोष्टीच कोरोना संसर्ग वाढण्यासाठी कारणीभूत ठरल्याचा दावा आराेग्य विभागाकडून केला जात आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून दररोज कोरोनाचे हजार ते बाराशे रूग्ण सापडत असून, त्यात सर्वसामान्य नागरिकांबरोबरच शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यानंतर शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय कार्यालयांचे कामकाज पूर्णत: बंद केले होते. त्यामुळे शासकीय कर्मचारी, अधिकारी घरीच बसून असल्याने त्यांच्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होते. मात्र, साधारणत: सप्टेंबर महिन्यापासून शासकीय कार्यालयांचे कामकाज काही प्रमाणात सुरू होऊन ५० टक्के उपस्थिती नोंदवली गेली होती. नोव्हेंबर, डिसेंबरपासून शासकीय कार्यालयांचे कामकाज पूर्णपणे शंभर टक्के उपस्थितीत सुरू झाले व तेव्हापासून कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढल्याचे शासकीय सुत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा पूर्णपणे नायनाट झालेला नसताना काही शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियमित हजेरीसाठी बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करण्याची सक्ती करण्यात आली असून, लवकरच जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समित्यांमध्ये बायोमेट्रिक पद्धती लागू करण्याच्या सक्तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बायोमेट्रिकमुळेही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. याचबरोबर नागरिकांशी दररोजचा संबंध येणाऱ्या महापालिका, विभागीय कार्यालये, जिल्हा परिषद, महसूल विभाग, तहसील कार्यालये, विभागीय महसूल कार्यालयांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून गर्दी वाढल्यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. त्यात एका टेबलावरून अनेक टेबलांवर फाईलींचा होणारा प्रवास, अभ्यागतांची कोणतीही विचारपूस न करता, बिनबोभाट असलेल्या त्यांच्या वावरामुळेही कोरोनाला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी केल्याशिवाय याठिकाणी काेरोनाला अटकाव करणे अशक्य असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
शासकीय कार्यालयांनाही कोरोनाचा विळखा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:14 AM