येवला : कोरोनाने शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही आपले जाळे विणले आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी बाधितांची संख्या प्रशासनासह येवलेकरांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. शहरात २४ एप्रिल रोजी मालेगाव कनेक्शनमधून पहिली कोरोनाबाधित महिला रुग्ण आढळून आली होती. तिच्यापाठोपाठ कुटुंबातील सात सदस्य बाधित झाले. येथून सुरू झालेली साखळी मे महिन्याच्या अखेरीस शून्यावर आली. मात्र दरम्यानच्या काळात पुन्हा बाधितांचा आकडा वाढल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.शहरात एप्रिलअखेर ७ बाधित असताना, पहिल्या रुग्णांच्या संपर्कातून येथील आरोग्य यंत्रणाच बाधित झाली. डॉक्टर, नर्स, स्टाफ असे तब्बल १२ जण बाधित झाले. रुग्णसंख्या वाढत असल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवल्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यावर सोपविली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही येवल्यात येऊन आढावा घेत उपाययोजनेबाबत यंत्रणेला सूचना केल्या. ३२ रुग्णसंख्या झाली असताना येवला कोरोनामुक्त करण्यात येथील यंत्रणेला यश आले. मात्र ते फार काळ टिकवता आले नाही. मे अखेर बाधितांची संख्या ३५ झाली. याबरोबरच गवंडगावच्या निमित्ताने कोरोनाने तालुक्यातील ग्रामीण भागातही शिरकाव केला. ४ जूनला शहरातील ३८ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने पहिला बळी गेला. त्यापाठोपाठ तब्बल १० बळी गेले. जूनमध्ये बाधितांची संख्या ९२ झाली, तर जुलैमध्ये ५८ झाली आणि ३ बळी गेले. शहरात दोनदा जनता कर्फ्यूचाही प्रयोग झाला.सद्य:स्थितीला तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या १९२ झाली असून, १४५ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत १४ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३३ झाली आहे. स्थानिक यंत्रणेत समन्वयाचा अभाव असल्याने कोरोना आटोक्यात येत नसल्याची सार्वत्रिक भावना शहरासह ग्रामीण भागात आहे. नागरिकदेखील नियम पाळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. येवला शहरासह तालुक्यातील सर्वच गावांमध्ये घरोघर सर्वेक्षण व आरोग्य तपासणी केली जात आहे. यातून मधुमेह, दमा, कॅन्सर, उच्चरक्तदाब आदी आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांची स्वतंत्र नोंद घेऊन त्यांना आरोग्य विभागाकडून रोगप्रतिकार शक्ती वाढवणाºया गोळ्या तसेच टॉनिक दिले जात आहे. येवला शहर पोलीस ठाण्यांर्तगत मास्क न वापरणे, विनाकारण फिरणे, दुकाने नियमित वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवणेविरोधात १८५ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी ७३ गुन्हे न्यायालयात सिद्ध झाले असून, १०१ जणांकडून दोन लाख १६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याबरोबरच दुचाकी, चारचाकी असे ५१० वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून त्यांच्याकडून एक लाख १५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल झाला आहे. येवला तालुका पोलिसांनीही लॉकडाऊन काळात १२९ केसेस दाखल केल्या असून, सुमारे १६ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. येवला नगरपालिकेनेही मास्क न वापरणे, सोशल डिटन्सिंगचे पालन न करणे याप्रकरणी १८६ व्यक्ती, व्यावसायिकांवर कारवाई करत ४६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. येवला शहरासह तालुक्यात एकूण ४५ कंटेन्मेंट झोन आहेत. सद्य:स्थितीत शहरात १८ तर ग्रामीण भागात ७ असे एकूण २५ कंटेन्मेंट झोन अॅक्टिव्ह आहेत. शहरातील मिल्लतनगर भागात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. शहरात आजपर्यंत एकूण ३९ कंटेन्मेंट झोन झाले आहेत. सध्या कासार गल्ली, आंबेडकर नगर, आझाद चौक, संजय गांधी नगर, मेनरोड, बजरंग मार्केट, चिंचबारी, विठ्ठलनगर, बुंदेलपुरा, मिल्लतनगर, ताज पार्क, पाबळे गल्ली, पहाड गल्ली-पिंजार गल्ली, कचेरी रोड, परदेशपुरा, जुनी नगरपालिका रोड, शिंपी गल्ली, आठवडे बाजार तसेच तालुक्यातील गवंडगाव, पिंपळखुटे, आडसुरेगाव, भाटगाव, देशमाने खुर्द, सोमठाण देश, मातुलठाण, नागडे या गावांमध्ये कंटेन्मेंट झोन अॅक्टिव्ह आहेत.शहर व तालुक्यात प्रशासकीय यंत्रणेसह आरोग्य यंत्रणा कोरोनाची साखळी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. मात्र, नागरिक नियम पाळत नाहीत. मास्क, सॅनिटायझरचा वापर करत नाहीत. फिजिकल डिस्टन्सिंग पाळत नाही. यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. दुर्धर आजाराने ग्रस्तांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. परिणामी ते कोरोनाला बळी पडत आहेत. असे असले तरी रुग्णांचा रिकव्हरी रेट ७० टक्क्यांपेक्षा अधिक असून मृत्युदर ७ टक्के आहे. नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.- डॉ. हितेंद्र गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी, येवला
येवल्यात कोरोना वाढता वाढता वाढे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 10:52 PM
कोरोनाने शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही आपले जाळे विणले आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी बाधितांची संख्या प्रशासनासह येवलेकरांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. शहरात २४ एप्रिल रोजी मालेगाव कनेक्शनमधून पहिली कोरोनाबाधित महिला रुग्ण आढळून आली होती. तिच्यापाठोपाठ कुटुंबातील सात सदस्य बाधित झाले. येथून सुरू झालेली साखळी मे महिन्याच्या अखेरीस शून्यावर आली. मात्र दरम्यानच्या काळात पुन्हा बाधितांचा आकडा वाढल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
ठळक मुद्देप्रशासनाची डोकेदुखी वाढली : नागरिकांकडून फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन