येवला : कोरोनाने अर्थिक अडचणीत आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या येवला आगारालाही मोठा फटका बसला आहे. कोरोनाने गेली वर्षभर समस्यांना तोंड देत येवला आगाराने प्रवासी सेवेचे ब्रीद सुरूच ठेवले. लॉकडाऊन, संचारबंदी, प्रवासबंदीने लालपरी आगारात लॉक झाली. परिणामी परिवहन महामंडळ व कर्मचारीही अडचणीत आले आहेत.
मिशन बिगीन अगेनमध्ये परिवहन महामंडळ स्थिरावत असताना आगाराने मालवाहतूक सेवेतून उत्पन्न मिळविण्याचाही प्रयत्न केला. मात्र आता, अंशत: लॉकडाऊनमध्ये पुन्हा लालपरी लॉक होत आहे. येवला आगारात ४७ एसटी बसेसपैकी अवघ्या २७ बसेस सध्या सुरू आहेत. त्याही जिल्हा व इतर जिल्ह्यात. २७पैकी अवघ्या तीन बसेस ग्रामीण भागात सुरू आहेत.कोरोनामुळे एसटीला अजूनही पाहिजे तसा प्रवासी प्रतिसाद मिळत नसल्याने खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. गेल्या वर्षी येवला आगाराला मार्च अखेर ७२ लाख ६० हजार रुपये उत्पन्न झाले होते, तर यंदा ३६ लाख ५२ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. उत्पन्नातील ही तूट कशी भरून निघणार हा मोठा प्रश्न आगार व्यवस्थापनापुढे आहे.