नाशिक : शहराजवळील चांदशी शिवारातील नामांकित अशोका युनिव्हर्सल स्कूलमधील नववीचा एक विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आला आहे. हा विद्यार्थी परीक्षेसाठी शाळेत येत असताना दोन दिवस गैरहजर राहिल्याने त्याची चौकशी केली असता संबंधित विदयार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वर्गातील सर्व ६७ मुलांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. त्यासोबतच नऊ शिक्षिकांचीही तपासणी करण्यात आली असून ग्रामीण आरोग्य यंत्रणेने संसर्गाचा स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. येत्या दोन दिवसांत कोरोना चाचणीचे अहवाल आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर अधिक चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वीच इगतपुरीमधील मुंढेगाव येथील आश्रमशाळेतील पंधरा विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हेाते. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले असले तरी त्यांना ओमायक्रॉनचा संसर्ग आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्या पाठाेपाठ आता आणखी एका खासगी शाळेत एका मुलाला संसर्ग आढळल्याने खळबळ उडाली आहे.