निऱ्हाळे : कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असल्याने, जनता कर्फ्यू व लॉकडाऊनमुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्याला आताच्या खरिपासाठी लागणारे भांडवल उभारणे जिकिरीचे होत आहे. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही खरिपाच्या पिकांवर कोरोनाचे सावट आहे.लॉकडाऊनमुळे बाजार समित्या कधी बंद तर कधी चालू असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीस अडचण येत आहेत. शिवाय माल विक्रीसाठी नेला तर त्यास भाव मिळत नसल्याने चालू खरिपाच्या हंगामावर चांगलाच परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी गुंतला आहे. शेतकऱ्यांची कांदा काढणी, साठवणूक, शेती नांगरणी, शेण खताची शेतात फवारणी आदी कामांना वेग आला आहे.साधारण मे महिन्याच्या शेवटी खते आणि बियाणांच्या खरेदीसाठी कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. अनेक शेतकरी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपल्या शेतातील कामे चालू करतात. परंतु येत्या काही दिवसात महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. यंदा पाऊस लवकर हजेरी लावणार असला तरी कोरोना लवकर हटला नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागणार असल्याचे शेतकऱ्यात बोलले जात आहे.
खरीप पिकांवर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 3:48 PM
निऱ्हाळे : कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असल्याने, जनता कर्फ्यू व लॉकडाऊनमुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्याला आताच्या खरिपासाठी लागणारे भांडवल उभारणे जिकिरीचे होत आहे. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही खरिपाच्या पिकांवर कोरोनाचे सावट आहे.
ठळक मुद्देशेतकऱ्यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागणार