तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक तहसील कार्यालयात नागरिकांची मोठी वर्दळ असते. भूधारकांचे हक्क, महसूल, आपत्कालीन मदत, सुनावणी, हक्क नोंदणी, विविध प्रकारचे प्रमाणपत्र, जमाबंदी संकलन आदी विविध प्रकारचे कामे तहसील कार्यालय पातळीवर सुरू असतात. त्यामुळे या कार्यालयात नागरिकांची सातत्याने ये-जा सुरू असल्याने कर्मचाऱ्यांचा नियमित नागरिकांशी संपर्क येतो.
शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र रुग्ण आढळत आहेत. सातत्याने नागरिकांचा संपर्क येणाऱ्या जिल्हा परिषद तसेच महापालिकेतील अनेकांना कोरोनाने गाठले आहे. आता तहसील कार्यालयातील कर्मचारीदेखील बाधित झाल्याने ते सध्या उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयामध्ये अपेक्षित काळजी घेतली जात नसल्याचे दिसून आले. नायब तहसीलदारांच्या केबिनपासून ते कारकुनांच्या टेबलापर्यंत नागरिकांचा थेट वावर आहे.
येथील कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्यानंतरही कार्यालयात सुरक्षित अंतराची पुरेशी काळजी घेण्यात आलेली नाही. सर्व टेबल्स जवळजवळ आहेत, तर कार्यालयात नेहमीच गर्दी बघायला मिळते. अभ्यागतांकडून अंतराचे पालन केले जात नाहीच शिवाय या ठिकाणी आलेल्यांचे थर्मल स्कॅनिंगही होत नाही. अभ्यागत तसेच कर्मचारी मास्कचा पुरेसा वापर करीत नसल्याने धोका अधिक वाढला आहे.
न्--इन्फो--
नागरिकांची कामे होणे अपेक्षित आहेच; परंतु सुरक्षितता आता प्रथम प्राधान्यावर अपेक्षित आहे. त्यादृष्टीने कोणतेही नियोजन येथे झालेले दिसत नाही. अधिकारी केबिनमध्ये सुरक्षित असताना कर्मचाऱ्यांना मात्र नागरिकांच्या गराड्यातच काम करावे लागत आहे. अन्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने देखील नियोजन करण्याची गरज आहे.