येवला : (योगेंद्र वाघ ) कोरोना विषाणू प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. यामुळे शहरातील यंत्रमाग ठप्प आहेत. तर यंत्रमागावर अवलंबून असणारी शेकडो कुटुंबे बेरोजगार झाली. गेल्या दोन महिन्यांत शहरातील कापड व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शिथीलता मिळाल्याने शहरातील दुकाने सुरू झाली असली तरी या दुकानांमध्ये खरेदीदार येत नसल्याने व्यापारीवर्ग चिंतेत आहेत.नाशिक, नगर, धुळे, औरंगाबाद या चार जिल्ह्याच्या मध्यवर्ती असणाऱ्या येवला शहराची कापड बाजारपेठ नावाजलेली पेठ आहे. कापड खरेदीसाठी बाहेरून मोठ्या प्रमाणात ग्राहक येथे येत असतात. पैठणीच्या निमित्ताने महाराष्ट्रासह बाहेरूनही ग्राहक येतात, पैठणी बरोबरच इतर कापड, साड्यांची खरेदी करतात. परंतु लॉकडाऊनने पैठणीबरोबरच येथील कापड व्यवसाय देखील लॉक झाला आहे. येवला शहरातील मेनरोड म्हणजे कपड्यांची बाजारपेठ. शहरात सुमारे दीडशे पेक्षा अधिक कापड दुकाने आहेत.यात नव्याने ब्रॅण्डेड तयार कपड्यांच्या अनेक शोरूमची भर पडली आहे. दरवर्षी लग्नसराईत दररोज लाखो रु पयांची उलाढाल होते. मात्र, लॉकडाउनमुळे बाजारपेठ लॉक झाली अन् उलाढालही थांबली. लग्नसराई तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच व्यापारीवर्गाने जानेवारीपूर्वीच मोठ्या प्रमाणावर माल भरून ठेवला होता. आता, हा माल जाईल त्या किमतीत विक्र ी करावा लागणार आहे. या बरोबरच शालेय सीझन देखील यंदा कोरोनाने हातचा गेला आहे. परिणामी कापड व्यावसायिकांचा कोट्यवधी रूपयांचा धंदा यंदा बुडाला असून वर्षाचे आर्थिक गणितही बिघडले आहे.कोरोनाने येवल्यातील यंत्रमागांचा खडखडाट थांबला परिणामी यंत्रमाग कारागीर बेरोजगार झाले. या यंत्रमागावर तयार होणारे उपरणे महाराष्ट्रात जात असतात. कोरोनाने लग्न व इतर समारंभांवर बंदी आणली त्याबरोबरच उपरणे व्यवसायालाही टाळे लागले. यंत्रमाग व्यवसायावर येवला शहरातील बहुसंख्येने मुस्लीम बांधवांची शेकडो कुटुंबे अवलंबून आहेत. ऐन हंगामात, रमजान काळातही शेकडो कुटुंबे बेरोजगार झालीत. कारागीरांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी व बड्या मंडळींनी जकातच्या निमित्ताने या कुटुंबांना चरितार्थासाठी मोठा हातभार लावला. शासन वेगवेगळ्या घटकांसाठी पॅकेज जाहीर करत असतांना यंत्रमाग व्यवसायिक, कापड व्यावसायिकांसाठी काय असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.-----------------------यंत्रमाग व यंत्रमाग कारागीरांच्या हितासाठी पैठणी प्रमाणेच येवल्यात यंत्रमागासाठीही क्लस्टर व्हावे. यंत्रमागाच्या वीज बीलात सवलत मिळावी. तसेच यंत्रमागासाठी लागणारा कच्चा माल शासनाने स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देवून यंत्रमाग चालकांना दिलासा द्यावा. या बरोबरच कारागीरांसाठीही सोयी, सवलती देणे गरजेचे आहे.- मुश्ताक अन्सारी, यंत्रमाग कारागीर