नाशिक : कोरोनाने धावपळीला थोडासा लगाम घातला, बहुश्रुतता दिली, बाहेरच्या अनावश्यक गोष्टी टाळायला शिकविले, प्रदर्शन हव्यास वाटणाऱ्या गोष्टी बंद करतानाच समाजाला थोडेेफार तरी शहाणे केले. प्रदूषण संपत्तीचा अपव्यय बंद झाला, एकमेकांवरचे लादणे कमी झाले. माणसाला पूर्णपणे वैयक्तिक केले. आपल्या अस्तित्वाचे भान दिले. त्यामुळे माणूस आपल्या आंतरिक क्षमतांकडे वळून काहीसा आंतरिक झाल्याचे प्रख्यात लेखक आणि अभिनेते दीपक करंजीकर यांनी सांगितले.
सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या वतीने ‘शब्दजागर : भेटूयात घरोघरी’ या व्याख्यानमालेत नाशिकचे लेखक अभिनेते दीपक करंजीकर यांनी ‘आपत्तीतील ऊर्जा’ या विषयावर पुष्प गुंफले. कोरोनाने जागतिक सभ्यतेचे स्वरूपही बदलले. वाईट प्रथांचे निर्मूलन केले. एक नवी ऊर्जा आपल्यात निर्माण केली. आपत्ती काळातील ऊर्जा माणसात परिवर्तन घडवून आणते. देशात सध्या ३२ कोटी मुले ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. हे जागतिक स्तरावरचे फार मोठे काम होत आहे, तर अमेरिकेच्या लोकसंख्येपैकी दोन कोटी जास्त लोक ऑनलाइन शिक्षण, व्यवसाय, व्यवहार, करीत आहेत. आपण आपल्या आवडी छंद, कला, लेखन याकडे वळल्याचेही त्यांनी नमूद केले. त्याशिवाय करंजीकर यांनी सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक या क्षेत्रांतील बदलांचा आढावा घेतला. व्याख्यानानंतर अनेकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक भानुदास शौचे यांनी केले. करंजीकर यांचा परिचय देवदत्त जोशी यांनी करून दिला, तर आभारप्रदर्शन कार्याध्यक्ष संजय करंजकर यांनी केले.