नांदगाव तालुक्यात व विशेषत: मनमाड भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, आरोग्य विभाग त्यासाठी प्रयत्नशील असल्याने त्याची पाहणी बनसोड यांनी केली. यावेळी तालुकास्तरीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना नांदगाव तालुक्यातील कोरोना वाढीचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. हिसवळ येथील विलगीकरण केंद्रातील रुग्णांशीदेखील त्यांनी संवाद साधला. यावेळी वेळोवेळी तापमान आणि ऑक्सिजन तपासले जाते का, याबद्दल विचारणा करीत आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आलेल्या व्यवस्थेबद्दल समधान व्यक्त केले. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांना प्रत्येकी एका तालुक्याची जबाबदारी देण्यात आली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड या स्वत:सुद्धा जिल्ह्यात सर्वत्र उपस्थित राहून पुढील काळात आढावा घेणार आहेत. त्यांच्यासमवेत उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, कार्यकारी अभियंता सुनंदा नरवाडे यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
(फोटो ०७ झेडपी)