पश्चिम भागात पहिल्या लाटेत ननाशी या बाजारपेठेचे गाव वगळता अन्य ठिकाणी कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता व आताही किरकोळ अपवाद वगळता बहुतांशी गावांत कोरोनाला रोखण्यास येथील नागरिक यशस्वी झाले आहेत. यातील बहुतांशी गावांची लोकसंख्या एक हजारापेक्षा कमी आहे. या गावांमधील बहुतांशी नागरिक शेतमजूर असून, नियमांच्या पालनासोबतच गावातील स्वच्छता, ग्रामपंचायतीतर्फे औषध फवारणीचा फायदा झाला आहे. नुकत्याच झालेल्या होळी सणानिमित्त अनेक पूर्वभागात द्राक्ष बागांच्या कामासाठी स्थलांतरित शेतमजूर गावी येऊन पुन्हा कामावर परतले आहेत. तालुक्यात बाहेरगावी नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण काहीसे कमी असले तरी हजार, दीड हजार नागरिक नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे, आदी ठिकाणी आहेत. सुरुवातीच्या काळातही स्थलांतरित कामगार, नोकरवर्ग यांच्याबाबत गावी आल्यास वस्तीवर राहण्यास भाग पाडले गेले होते; मात्र कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर त्याबाबत तशी काळजी घेतली गेलेली नसली तरी कुणी बाहेरून आल्यास त्यांच्या तब्बेतीवर लक्ष मात्र ठेवले जात होते.
गेल्यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलत त्या नुकत्याच पार पडल्या. त्यावेळी कोरोनाचा प्रभाव कमी असल्याने त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले. मात्र, त्यास कुणीही मनावर घेतले नाही. आज त्याच काही गावांत कोरोना रुग्ण आहेत. मध्यंतरीच्या काळात फिजिकल डिस्टन्सिंग व मास्कबाबत कुणीही गंभीर नव्हते. लग्न सोहळे यासह विविध कार्यक्रम, राजकीय मेळावे मोठ्या थाटात पार पडले; मात्र पुन्हा कोरोना प्रार्दुभाव वाढल्याने गावोगाव विविध उपाययोजना होत आहे. मास्क वापराचे प्रमाण वाढले असून, अडगळीत पडलेले सॅनिटायझर पुन्हा बाहेर आले आहे. नागरिक काळजी घेताना दिसत असले तरी काही कार्यक्रमांत फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे.