नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा तीन हजारांनजीकचा बाधित आकडा गाठून भयसूचक इशारा दिला आहे. गुरुवारी (दि. २५) तब्बल २९९४ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. इतक्या सलग महिन्यात आधी दीड हजार, नंतर दोन ते अडीच हजार आणि पुन्हा बुधवारपासून तीन हजारांच्या आसपास रुग्ण आढळणे ही प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या दृष्टीने खूपच चिंतेची बाब ठरली आहे, तसेच तब्बल १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या २२७४ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात गुरुवारी २३३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, नाशिक मनपा क्षेत्रात ५, मालेगाव मनपात १, ग्रामीणला ४ तर जिल्हाबाह्य २ असे एकूण १२ जणांचे बळी गेले आहेत. लग्नसोहळे आणि उत्सवी वातावरणामुळे तसेच जनतेत कोरोनाबाबत आलेल्या बेफिकिरीमुळे कोरोनाला दुसऱ्या लाटेची संधी मिळाली आहे. दोन आठवड्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने प्रचंड वेगाने वाढू लागल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून वारंवार इशारे देऊन कठोर निर्बंधदेखील घालण्यात आले; मात्र त्यानंतरही नागरिकांनी विशेष दक्षता घेतली नसल्याचे गुरुवारच्या बाधित आकडेवारीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. बुधवारी तीन हजारांवर तर गुरुवारी तीन हजारांनजीक गेल्याने यंत्रणेपुढे गंभीर निर्णय घेण्यावाचून पर्याय उरलेला नसल्याची चर्चा आहे.
इन्फो
रुग्ण बरे होण्याच्या दरात १४ टक्के घसरण
जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा दर मागील महिन्यापर्यंत ९८ टक्क्यांवर पोहोचला होता; मात्र मार्च महिन्याच्या प्रारंभापासून रुग्णवाढ अधिक आणि कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण कमी होऊ लागले. त्यामुळे गत आठवड्यापासून कोरोनामुक्त रुग्णांचा दर दिवसाला एक टक्क्याने घसरु लागल्याने गत दोन आठवड्यात कोरोनामुक्त दर ८६.७१ टक्के म्हणजेच तब्बल १० टक्क्यांनी घसरला आहे.
इन्फो
प्रलंबित तब्बल ५७७९
प्रलंबित अहवालांच्या संख्येने गुरुवारी पुन्हा पाच हजारांचा टप्पा ओलांडत ५,७७९ पर्यंत मजल गाठली आहे. त्यात नाशिक मनपा क्षेत्रातील १६२० , नाशिक ग्रामीणमधील ३०५९ तर मालेगाव मनपामधील ११०० संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत. प्रलंबित अहवाल संख्या कमी होत नाही, तोपर्यंत बाधित आकड्यात घट येण्याची शक्यता कमीच आहे.
इन्फो
उपचारार्थी एकूण रुग्ण १८,९७३
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्यादेखील सातत्याने वाढत असल्याने शासकीय आणि खासगी कोविड हॉस्पिटल्सवरदेखील मोठाच ताण आला आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात तब्बल १८ हजार ९७३ कोरोना बाधितांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीतून दिसून येत आहे.