लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोनामुळे गेल्या वर्षी महापालिकेच्या वृक्षलागवडीलाही फटका बसला आहे. कोरोनाचे संकट आल्यानंतर निविदा काढण्यात आलेल्या अडचणी, तसेच मजूर मिळण्यातील अडचणी, यामुळे पाच हजार वृक्षांची लागवड रखडली हाेती. मात्र, गेल्या वर्षीच्या अचानक उद्भवलेल्या संकटानंतर यंदा मात्र उद्यान विभागाने यंदा अगोदरच काळजी घेत, पुन्हा बारा हजार रोपे लावण्याचे नियोजन केले आहे.
नाशिक शहरात हरीत क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहेत. २०१७ मध्ये महापालिकेने केलेल्या वृक्षगणनेेत ४७ लाखांहून अधिक वृक्ष आढळले आहेत. ज्यांना
जीपीएसद्वारे जोडण्यात आले असून, त्यामुळे कोणत्या झाडावर कुऱ्हाड चालली, ते स्पष्ट होत आहे. महापालिकेने २०१८ पासून वृक्ष लागवडीचे वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात देवराई ही अभिनव संकल्पनाही राबविली आहे. त्यात अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सह्याद्री देवराईकार सयाजी शिंदे यांनी मदत आणि मार्गदर्शन केले आहे. प्रत्येक प्रभागात एक देवराईही संकल्पना राबवत असताना, राज्य शासनच्या वन महोत्सव आणि महापालिकेची नियमित वृक्ष लागवड असे सुमारे तीस ते चाळीस हजार वृक्षही लावले आहेत. वनखात्याच्या नियोजनानुसार गोदाकाठी बांबू लागवड मोहीमही हाती घेण्यात आली. गोदाकाठी मातीची धूप होण्यापासून संरक्षण देताना ते उत्पन्नाचे साधनही ठरू शकते. दरम्यान, महापालिकेचा वृक्षारोपण कार्यक्रम जोमात असताना गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून अचानक कोरोनामुळे लॉकडाऊनचे संकट उद्भवले. महापालिकेने गेल्या वर्षी १२ हजार रोपे लावण्याचे नियोजन केले आणि त्यानुसार निविदाही मागवल्या. मात्र, लॉकडाऊनमुळे मजूर मूळ गावी परतल्याने, त्यातील जेमतेम सात हजार रोपे लावण्यात यश आले आणि पाच हजार रोपे लावता आली नाही, त्यातही कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी बराचसा निधी आरोग्य विभागावर खर्च करण्यात आला.
यंदा महापालिलकेने बारा हजार रोपे लावण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी लवकरच प्रस्ताव तयार करण्यात येणार असून, आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील वृक्ष प्राधिकरण समितीने मान्यता दिल्यानंतर वृक्षलागवडीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.
इन्फो...
महापालिकेच्या सर्वात मोठ्या अशा जेतवन रोपवाटिकेचे खासगीकरण करण्याची योजना महापौर सतीश कुलकर्णी यांनी घोषित केली हेाती. मात्र, ती कोरोनामुळे रखडली आहे. उद्यान विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने रोपवाटिका आणि रोपांची लागवड करण्यात अडचण येत आहे. आताही वृक्ष लागवड करण्यासाठी महापालिकेची भिस्त ठेकेदारावर आहे.