नाशिक : जिल्ह्यात कोरोनावाढीचा वेग जुलै महिन्याच्या प्रारंभापासून महिनाभर मंदावला होता. मात्र, ३१ जुलैला १ च्या आसपास असलेला कोरोना वृद्धीचा पॉझिटिव्हिटी दर या आठवड्याच्या उत्तरार्धात अडीच टक्क्यांपर्यंत म्हणजेच सुमारे दुपटीहून अधिक वाढू लागला आहे. त्यामुळे महिनाभरापासून मंदावत चाललेले कोरोना रुग्णांचे प्रमाण निर्बंध शिथिलतेनंतर तत्काळ वाढू लागल्यासारखे भासत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण जुलै महि्न्यापासून सर्वाधिक वेगाने घटले होते. जुलै महिन्याच्या प्रारंभी कोरोना उपचारार्थी रुग्णांची संख्या २४४३ इतकी होती. त्यानंतर जवळपास महिनाभरात कोरोनाचे नवीन रुग्ण कमी आणि कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण बहुतांश वेळा अधिक राहिल्याने एकूण उपचारार्थी संख्या ३१ जुलैपर्यंत ११०५ इतकी खाली आली होती. त्यामुळे आता ऑगस्टमध्ये याच वेगाने कमी होत गेल्यास कोरोनाची उपचारार्थी संख्या निम्म्याहून अधिक कमी होण्याची अपेक्षा होती. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनामुक्त आणि नवीन बाधित प्रमाण एकतर जवळपास समान किंवा काही वेळा तर बाधितांची संख्या अधिक राहू लागल्याने एकूण उपचारार्थी संख्या त्यानंतर तेरा दिवसांनीदेखील १,१२७ वर आहे. गत पंधरवड्यात एकूण उपचारार्थी संख्या १०५० पर्यंतदेखील गेली. मात्र, हजाराच्या खाली न उतरता पुन्हा अकराशेवरच राहिली आहे. सध्या उपचारार्थी संख्या घटवून कोरोनाचे नवीन रुग्ण कमी यावेत यावरच भर देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
इन्फो
पॉझिटिव्हिटी दर १ वरून २.३० टक्के
जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध काहीसे शिथिल करण्यास दोन आठवडे आठवड्यांचा कालावधी उलटून गेला आहे. नेमका तेवढ्याच कालावधीत कोरोनाबाधितांचा दर वाढू लागल्याने हा वाढता दर चिंतेचे कारण ठरत आहे. १ ऑगस्टला पॉझिटिव्हिटी दर हा १ टक्क्याच्या आसपास होता. तोच पॉझिटिव्हिटी दर ८ ऑगस्टला १.५ टक्क्यांपर्यंत वाढला. तर दोन आठवड्यांत म्हणजेच १३ ऑगस्टला २.३० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
इन्फो
मृत्युदरात वाढ नसल्याचा दिलासा
कोरोनाचे रुग्ण तसेच पॉझिटिव्हिटी रेटमध्ये काहीशी वाढ होत असताना जिल्ह्यात गत पंधरवड्यात साधारणपणे २ ते ४ नागरिकांचे मृत्यू होत आहेत. या मृत्युदरात वाढ झालेली नाही, हाच काहीसा दिलासा आहे. त्यामुळे अजून पॉझिटिव्हिटी रेट वाढला तरी किमान मृत्युदरात वाढ होऊ न देण्याची दक्षता आरोग्य विभागाला बाळगावी लागणार आहे.
---------------------
पान दोनसाठी मेन बातमी