नाशिक : कोरोना महामारीपासून सर्वांची लवकरात लवकर सुटका होण्यासाठी सुरू असलेल्या अनुष्ठानाची बुधवारी (दि. ११) नाशिक शहरातील मान्यवरांच्या हस्ते गंगापूजन करून सांगता करण्यात आली. या अनुष्ठानाचे आयोजन महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते.
कोरोनाच्या संकटमुक्तीसाठी महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वतीने पाठशाळेतील विद्यार्थी आणि गुरुजनांनी रुद्राचे अनुष्ठान सुरू केले होते. दररोज विद्यार्थी आणि गुरुजन यांनी घरी रुद्राचे अनुष्ठान केले होते. मंगळवारी (दि.११) या अनुष्ठानाची सांगता गंगापूजनाने व चर्तुवेदाचे पारायण करून करण्यात आली. गंगापूजनाप्रसंगी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, वेदमूर्ती शांताराम भानोसे, वेदमूर्ती भालचंद्रशास्री शौचे, नितीन मोडक, मुकुंद आंबेकर, दिनेश गायधनी, महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त वेदमूर्ती रवींद्र पैठणे, गोविंद पैठणे यांच्यासह शहरातील मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते. गंगापूजनानंतर श्रृंगेरी शंकराचार्य मठात चर्तुवेदाचे पारायण करण्यात आले.