नाशिक - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींच्या वर गेला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५७८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २५२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल साडे चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान ओमायक्रॉनने टेन्शन वाढवलं आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रातही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. याच दरम्यान आता नाशिककरांची चिंता वाढली आहे. पश्चिम आफ्रिकेतून आलेल्या नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पॉझिटिव्ह आलेला नागरिक हा पश्चिम आफ्रिकेचा नागरीक आहे. पश्चिम आफ्रिकेच्या माली या देशातला नागरिक नाशिकमध्ये एका खासगी कंपनीत आला होता. गेल्या तीन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आल्याने त्याची कोरोना चाचणी केली होती तीन नागरिकांपैकी एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दोन जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. संपर्कात आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ५६९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात ४९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्यातील आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ९३ हजार ००२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७२ टक्के आहे. राज्यात आज पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. राज्यात सध्या ६ हजार ५०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात ७४ हजार १९० व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर ८८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
संपूर्ण जगामध्ये सध्या कोरोनाच्या ओमायक्रोन विषाणूचा धुमाकूळ सुरू आहे. राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. राज्यात दोन ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. यापैकी एक रुग्ण पुणे आणि एक रुग्ण लातूरमधील आहे. आतापर्यंत २० ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी ९ जणांना रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.