नाशिक : जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट अडीच टक्क्यांच्या पुढे असला तरी जिल्हा अजूनही तिसऱ्या टप्प्यातच असल्याने सध्या लागू असलेले निर्बंध पुढील आठवड्यातही कायम राहणार आहे. त्यामुळे निर्बंधांबाबत असलेल्या आदेशात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दुकानांची वेळ कमी करण्यात आल्याची अफवा रविवारी बाजारपेठेत पसरली होती. नागरिकांनी त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनीदेखील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेदेखील आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील कारोनाची स्थिती काहीशी नियंत्रणात असून, रुग्ण फारमोठ्या संख्येने वाढलेले नसले तरी कमीदेखील झालेले नाहीत. कोरोना रुग्णांची संख्या काहीसी वाढत असताना शनिवारी (दि.३) १३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. या परिस्थितीवर जिल्हा प्रशासन, तसेच आरोग्य विभागाचे लक्ष असून, डेल्टा प्लसचा संभाव्य धोका लक्षात घेता असलेल्या निर्बंधांत कोणत्याही प्रकारे सूट देण्यात आलेली नाही किंवा निर्बंध अधिक कठोरदेखील करण्यात आलेले नाहीत. जिल्ह्यातील कोरोनास्थिती नियंत्रणात राहण्यासाठी सर्वच यंत्रणांना अधिक काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधांप्रमाणे पुढील आठवड्यातही दुकानांची वेळ ही सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच कायम राहणार आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हॉटेल्स, ढाबे यांना असलेले निर्बंध आणि नियमदेखील कायम आहेत. लग्न सोहळे, समारंभांना होणारी गर्दी याकडे पुढील काळात अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. जीवनाश्यक सेवा वगळता अन्य आस्थापनांना असलेले निर्बंध कायम आहेत.
--इन्फो--
पोलिसांचे तंबू आणि अफवा
शहरात जमावबंदी आदेश लागू असल्याने ठिकठिकाणी पोलिसांचे तंबू उभारण्यात आले आहेत. रविवारी शहरात रविवार कारंजासह आणखी काही ठिकाणी तंबू उभारण्याचे काम करण्यात येत असल्याने बाजारात निर्बंध अधिक वाढल्याची अफवा पसरली होती. बाजारपेठेतील वेळ कमी करण्यात आल्याची चर्चा व्यापाऱ्यांमध्येदेखील सुरू होती. मात्र, ही केवळ अफवा ठरली. प्रशासनाने नियमात कोणताही बदल केलेला नाही.