नाशिक : कोरोनापासून बचावासाठी प्रारंभापासून मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर हेच बचावाचे मुख्य अस्त्र असल्याचे सांगण्यात आले. काेरोना कमी झाल्यानंतर या तिन्हींच्या वापरात घसरण सुरू झाली. त्यातही कोरोनाचे प्रमाण पुन्हा वाढल्यानंतर मास्क आणि सामाजिक अंतराबाबत शासन, प्रशासन स्तरावरुन सक्ती असल्याने त्यात पुन्हा वाढ झाली. मात्र, सॅनिटायझरच्या वापराच्या प्रमाणात गत वर्षाच्या तुलनेत ५५ ते ६० टक्के घट झाली आहे.
नाशिकमध्ये ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या घटल्याने बेफिकीर नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर कमी केला आहे. गतवर्षीच्या मध्याच्या तुलनेत सॅनिटायझरची विक्री अवघी ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत आली आहे. मध्यंतरी कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली. त्यामुळेच सॅनिटायझर किंवा सातत्याने हात धुण्याच्या उपायांकडे दुर्लक्ष होत गेले आहे.
रुग्णसंख्या घटल्याने आता कोरोना गेला किंवा आपल्याला काहीच होणार नाही, अशा अविर्भावात नागरिक नूतन वर्षाच्या प्रारंभापासून वावरत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक सॅनिटायझरचा सातत्यपूर्ण वापर किंवा दिवसभरात किमान आठ-दहा वेळा हात धुण्याच्या नियमांपासून दूर गेले. हातात किंवा खिशात सातत्याने सॅनिटायझरची बाटली अथवा स्प्रे ठेवणाऱ्या नागरिकांनी आता सॅनिटायझर वापरणे कमी केल्याने सॅनिटायझरच्या वापरात मोठी घट आली आहे.
इन्फो
वर्षभरात प्रचंड चढ-उतार
शहरात सॅनिटायझरचा गतवर्षी मार्चमध्ये वापर खऱ्या अर्थाने सुरू झाला. प्रारंभी १०-२० टक्के असलेली विक्री मे जून महिन्यात ५०-६० टक्क्यांपर्यंत वाढली. या विक्रीत सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यापर्यंत हे प्रमाण १०० टक्क्यांपर्यंत वाढले. मात्र, ऑक्टोबर महिन्यापासून सॅनिटायझरचा खप १०-१५ टक्क्यांनी कमी होण्यास सुरुवात झाली. हा खप जानेवारीपर्यंत निम्म्यावर आला. तर फेब्रुवारी आणि मार्चच्या मध्यापर्यंत त्यात अजून १० टक्के घट आली आहे. मार्चच्या प्रारंभापासून कोरोना पुन्हा वाढू लागल्यानंतर सॅनिटायझर वापरात वाढ झाली असली तरी ते प्रमाण अवघे ५-१० टक्केच असल्याचे औषधी विक्रेते, सॅनिटायझर विक्रेत्यांचे मत आहे.
शहरातील हॉटेल, मोठ्या संस्था तसेच रुग्णालयांमध्ये सॅनिटायझरचा वापर सुरू आहे. मात्र, छोट्या दुकानांमध्ये सॅनिटायझर ठेवणे, घरांमध्ये सॅनिटायझर ठेवणे याचे प्रमाण निम्म्यावर आले असल्यामुळेच सॅनिटायझरच्या वापरात घट झाली आहे.
नयन ठाकरे, नागरिक
शहरात काही दिवसांपासून रुग्ण वाढत असल्याने सॅनिटायझरचा वापर थोड्या फार प्रमाणात वाढला आहे. मात्र, सॅनिटायझर वापरला तर कोरोना होतच नाही, अशी शाश्वती उरली नसल्याने सॅनिटायझरचा वापर बराचसा कमी झाला आहे.
दीपक पोतदार , नागरिक