नाशिक : देशात फेब्रुवारीपासूनच कोरोनाचे रुग्ण सापडू लागले असले तरी नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २९ मार्चला सापडला होता. त्यानंतरच्या नऊ महिन्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने जिल्ह्यात १ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. या नऊ महिन्यात कोराेनाचा प्रारंभ, अत्यल्प वेग, उद्रेक आणि उताराचे टप्पे नागरिकांनी अनुभवले आहेत.
कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतरचे प्रारंभीचे तीन महिने कोरोना रुग्णसंख्येतील वाढ अत्यल्प गतीने होती. जून महिन्याच्या प्रारंभीदेखील अवघे १०० रुग्ण झाले होते. जिल्ह्यातील पहिला बळी हा मे महिन्यात गेला असून प्रारंभी बळींची संख्यादेखील अत्यल्प वेगाने वाढत होती. मात्र, जूनच्या उत्तरार्धापासून कोरोना रुग्ण आणि बळी वाढण्यास काहीसा वेगाने प्रारंभ झाला. जुलैमध्ये कोरोना रुग्णसंख्या आणि बळींमध्ये लक्षणीय वाढ दिसू लागली. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक वेगाने कोरोना रुग्णसंख्या वाढ तसेच बळींची संख्या नोंदवली गेली. हे दोन महिने नाशिक जिल्ह्यासाठी कोरोनाच्या दृष्टीने घातक ठरले होते. या दोन महिन्यांमध्येच आतापर्यंतच्या एकूण बाधितांपैकी निम्म्याहून अधिक कोरोनाबाधित आणि बळींची नोंद झाली आहे. त्यानंतर ऑक्टोबरच्या उत्तरार्धात कोरोनाचा वेग काहीसा घटण्यास प्रारंभ झाला. तर गत दोन महिन्यात हा वेग आता बऱ्यापैकी कमी झाला असून नवीन रुग्णसंख्येत भर पडण्याचे प्रमाणदेखील बरेच खाली आले आहे. मात्र, गत नऊ महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने १ लाख १० हजारांचा टप्पा गाठला असून कोरोना मुक्त संख्येने १ लाख ५ हजारांहून अधिकचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्यात सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २ हजारच्या खाली पोहोचली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत बळी गेलेल्या मृत्यूची संख्या १९६२ असून जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण ९६.४० वर पोहोचले आहे.