अझहर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाविरोधातील युद्धात जसे डॉक्टर, पोलीस, परिचरिकांची भूमिका महत्त्वाची मानली जाते, अगदी तशीच भूमिका शासनाच्या आपत्कालीन मोफत वैद्यकीय सुविधेअंतर्गत सतत ‘आॅन रोड’ धावणाऱ्या ‘१०८’ मदत वाहिनीच्या रुग्णवाहिकाचालकांची व त्यावरील डॉक्टरांचीसुद्धा आहे. कोरोनाचा विळखा जसा शहर व जिल्ह्याभोवती अधिकाधिक घट्ट होत गेला, तसे या कोरोना आजाराच्या रुग्णांसाठी धावणा-या शासकीय रुग्णवाहिकांची जबाबदारीही वाढली असून, आतापर्यंत तीनशेहून अधिक रुग्णांची सुरक्षित वाहतूक करण्यास ११ रुग्णवाहिकांना यश आले आहे. कोरोना आजाराचा फैलाव रोखण्यासाठी शहरासह जिल्ह्यात आरोग्य विभागाची विविध पथके सातत्याने सर्वेक्षण करत कोरोना संशयित रुग्णांनाचा शोध घेत आहेत. तसेच आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच स्क्रिनिंग सेंटर, क्वारंटाइन सेंटरपर्यंत संशयित रुग्णांना पोहोचविणे तसेच तेथून पुन्हा रुग्णालयात घेऊन येणे अशा सर्वांत महत्त्वाचे कार्य शासनाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांद्वारे केले जात आहे. शहरामध्ये दोन आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नऊ अशा एकूण ११ रुग्णवाहिका या केवळ स्वतंत्ररीत्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ११ रुग्णवाहिकांचे चालक, त्यावरील डॉक्टर सातत्याने या कोरोना युद्धात आॅनरोड धावत प्रत्यक्षपणे लढा देत आहेत. रुग्णवाहिका चालक त्या रुग्णांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयापर्यंत किंवा केंद्रापर्यंत पोहोचवित असताना त्याच्या आरोग्याचीही तितकीच खबरदारी घेत असून, सोबत असलेले डॉक्टरही रुग्णांची तपासणी करताना स्वत:ची काळजी घेतात. सर्व रुग्णवाहिकांमध्ये आवश्यक प्रतिबंधात्मक साहित्य उपलब्ध असून, रुग्णांची हाताळणी, रुग्णवाहिका निर्जंतुकीकरण याबाबतचे शास्रशुद्ध प्रशिक्षण रुग्णवाहिकाचालकांना देण्यात आल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक डॉ. अश्विन राघमवार यांनी दिली.----------राज्यात अडीच हजार कोरोनाग्रस्तांना सेवाआतापर्यंत राज्यभरात १०८च्या रुग्णवाहिकांनी २ हजार ४३० कोरोना संशयित रुग्णांची वाहतूक केली आहे. यात १ हजार ५०७ रुग्ण हे त्यांची घरे, तसेच विविध ठिकाणांवरून रुग्णालयात नेण्यात आले आहेत. तर स्क्रिनिंग सेंटरमधील ९२३ जणांची रुग्णालय ते गृहस्थानबद्ध तसेच दुस-या रुग्णालयात पाठविण्याची भूमिका पार पाडली आहे.----------------सर्व रुग्णवाहिका ‘हाय अलर्ट’वरजिल्ह्यातील सर्वच रुग्णवाहिका ‘हायअलर्ट’वर असून, ७५ डॉक्टर व शंभरचालकांचा चमू कोरोनाच्या काळात गावखेड्यापर्यंत वैद्यकीय मदत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नेतृत्वात या रुग्णवाहिका कार्यरत असून, प्रशासनाकडून माहिती मिळताच रुग्णवाहिका इच्छितस्थळी धाव घेतात. मालेगाव तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या वाढत असल्यामुळे या भागात सध्या नऊपैकी किमान चार रुग्णवाहिका कार्यरत आहेत.
कोरोना युद्धात देवदूत बनून धावते ‘१०८’
By अझहर शेख | Published: April 24, 2020 10:58 PM