नाशिक : कोरोना काळात जग भारताकडे एक समर्थ पर्याय म्हणून बघत आहे. त्यामुळे कोरोना ही संधी समजून भावी पिढीने व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन भारतीय उद्योग महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुधीर मुतालिक यांनी केले.
उद्योग क्षेत्रातील आव्हाने आणि संधी या विषयावर ते बोलत होते. डिजिटल वसंत व्याख्यानमालेत स्व. निर्मला दातार स्मृती व्याख्यानात बारावे पुष्प मुतालिक यांनी गुंफले. कोरोना काळात अडचणी अनेक असल्या तरी उद्योगांसाठी आशादायक चित्र आहे. कोरोना एक गतिरोधक असून तो कधीतरी संपणारच आहे. भारतीय उद्योजक रडत किंवा गाऱ्हाणे गात बसत नाहीत, असेही मुतालिक यांनी नमूद केले. १४० कोटींच्या देशात मागणीचा तुटवडा नाही. लोकसंख्या हे उद्योगांचे बलस्थान असून आपण दृष्टिकोन बदलायला हवा. उद्योजकता,उद्यमशीलता भारतीयांच्या रक्तात असून, ती प्राचीन काळापासून चालत आली आहे. म्हणूनच कोरोना हे उद्योगजगतासमोरील आव्हान असू शकत नाही, असे ठाम मत सुधीर मुतालिक यांनी व्यक्त केले. भारतावर अनेक आक्रमणे झाली. समाज म्हणून मोठी पडझड झालीही असेल. इंग्रजांनी तर कणा मोडण्याचाही प्रयत्न केला. पण उद्योग जिवंत राहिला.
आज माणूस माणसाला भेटू शकत नाही. पण कोरोनाने मोठी संधी उद्योग क्षेत्रात निर्माण केली. कोरोनामुळे मागणी कमी झाली नसून पुरवठा तितकाच होतोय. फक्त सेवा देण्याची, उत्पादन करण्याची पद्धत बदलावी लागेल, असेही मुतालिक यांनी सूचित केले. भावी पिढीने गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन शेतीपूरक व्यवसायाकडे वळण्याची गरज आहे. कारण हीच राष्ट्राची गरज असल्याचे मुतालिक म्हणाले. याप्रसंगी मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले. तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.
फोटो
१२मुतालिक