सायखेडा : अवघे अवघे सारे जण! घ्या विठुरायाचे दर्शन, जगात आहे भारी पंढरीचा वारकरी....या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. आषाढी शुद्ध एकादशीला हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाºया पंढरपुरातील विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघणाºया दिंड्यांची वाट कोरोनाने रोखली आहे. जवळपास शंभर वर्षांची परंपरा खंडित झाल्याने निफाड तालुक्यातील शेकडो दिंड्या यंदा जाणार नसल्याने वारकºयांची अखंडतेची परंपरा खंडित होत आहे.आषाढी एकादशीला अवघे काही दिवस शिल्लक असताना गावागावांतून हजारो दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. रस्त्याच्या कडेने चालणारे वारकरी हातात भगवी पताका, गळ्यात टाळ मृदंग, विठुरायाच्या पादुका असणारी पालखी यासोबतच वारकºयांच्या मधुर कंठातून निघणारे भजनांचे सुरेल स्वर, मजल दरमजल करीत अनेक गावांतून विठुरायाचा गजर दिसणार नसल्याने भाविक भक्तांचा हिरमोड झाला आहे. निफाड तालुक्यातून जाणाºया शेकडो दिंड्या जवळपास वीस दिवस पायी चालत हे वारकरी पंढरपूरला पोहोचतात. अनेक गावांमध्ये मुक्काम करून त्या गावांमध्ये रात्रीचा कीर्तन सोहळा पार पाडतात. यंदा मात्र हे चित्र पाहायला मिळत नसल्याने वारकरी आणि भाविकांना काही तरी चुकल्यासारखे वाटत आहे. विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेल्या वारकºयांना यंदा या अमृतमय सोहळ्यापासून दूर राहावे लागणार आहे. म्हणूनच सारे वारकरी कोरोना रोगाचे थैमान थांबावे यासाठी विठुरायाला साकडे घालत आहे. कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने यंदा राज्यातील सर्वच देवस्थानांची दारे बंद केली आहे. कोणत्याही प्रकारचे धार्मिक स्थळ सुरू नसून गर्दी टाळण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात जमणारा भाविकांचा महामेळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
निफाड तालुक्यातून दरवर्षी पंढरपूरला पायी दिंडी सोहळ्यासाठी हजारो वारकरी आणि भाविक जात असतात. यंदा मात्र शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाल्याने खूप काहीतरी चुकल्यासारखे वाटत आहे.- चंदू राजोळे, अध्यक्ष, निफाड तालुका वारकरी सांप्रदाय
कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शासनाने यंदा अनेक वर्षांची परंपरा असणाºया दिंडी प्रथा बंद केली आहे. शासनाच्या या निर्णयाचे वारकºयांच्या वतीने स्वागतच आहे. आम्ही वारकरीदेखील प्रतिसाद देत शेकडो वर्षांची परंपरा थांबवत असलो तरी यंदा दिंडीचा सोहळा आणि विठुरायाचे दर्शन होत नसल्याची सल मात्र मनात कायम आहे.- पृथ्वीबाबा शिरसाठ, वारकरी.