मालेगाव : शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, गुरुवारी (दि. २१) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात एकूण आठजण बाधित आढळून आले. दरम्यान, शासनाच्या डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शहरात २० मोबाइल व्हॅनद्वारे रुग्ण शोधमोहीम सुरू असून, गुरुवारी (दि. २१) सोयगाव भागात तपासणी सुरू करण्यात आली आहे. रमजानच्या पार्श्वभूमीवर लोकांनी मशिदीत अथवा इदगाह मैदानावर गर्दी करू नये, याकरिताही उपाययोजना केल्या जात आहेत.बुधवारी (दि. २०) रात्री उशिरा मिळालेल्या अहवालात शहरातील चार बाधित रुग्ण आढळून आले होते. गुरुवारी शहरातील रसुलपुरा भागातील ५९ वर्षीय इसम बाधित आढळून आला होता. त्यानंतर दुपारी आलेल्या अहवालात आणखी सात जण बाधित सापडले आहेत. सात बाधितांमध्ये श्रीराम नगरातील ७५ वर्षीय वृद्ध इसम, गुलशेर नगरातील ५१ वर्षीय इसम, जहुर कॉलनीतील ६५ वर्षीय इसम, पवार गल्लीतील ६० वर्षीय इसम, नजमाबाद भागातील २८ वर्षीय महिला तर लोणवाडे येथील २८ वर्षाचा मुलगा आणि ५५ वर्षांच्या महिलेचा समावेश आहे.शासनाच्या ‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत शहरात भारतीय जैन संघटनेने दिलेल्या २० वाहनांद्वारे संशयित रुग्णांचा शोध घेतला जात आहे.गुरुवारी सोयगावच्या भगवती कॉलनी, माऊली कॉलनी या भागात नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणीत किरकोळ आजारी असणाऱ्या नागरिकांवर उपचार करण्यात आले. कोरोना संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना कोविड तपासणीसाठी पाठविण्यात आले. सोयगव भागात गेल्या तीन दिवसांपासून रुग्ण शोध मोहीम सुरू असून तीन महिन्यापर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.--------------------------------आज लष्करी तुकडी मालेगावीरमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात गर्दी होऊ नये, लोकांनी घरातच नमाजपठण करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नागरिकांनीही घरातच नमाजपठण करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांनी मशिदीत अथवा इदगाह मैदानावर गर्दी करू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे पूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. २२) लष्करी तुकडी शहरात दाखल होत असल्याचे अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले.
कोरोना संशयित रुग्णांची शोधमोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 8:45 PM