नाशिक : कोरोना व्हायरसचा सामना करण्यात आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, सर्व विभागांचे काम करणारे कंत्राटी कर्मचारी सातत्याने आघाडीवर होते. स्थळ, वेळ आणि काळाचं भान विसरून तसेच त्याबदल्यात संबंधित डॉक्टर, संबंधित कंत्राटदार आपल्याला ओव्हरटाईम किंवा काही प्रमाणात तरी अतिरिक्त वेतन देईल, अशी त्यांची सामान्य अपेक्षा होती. मात्र, दुसरी लाट संपल्यानंतर एक-दोन महिन्यांतच त्यातील निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करताना संबंधित यंत्रणांनी पगार, ओव्हरटाईमचे पैसे देताना अचानकपणे हात आखडता घेतला. संबंधित हंगामी कर्मचारी, कामगारांनी वारंवार फॉलोअप घेऊन झाला, आता तर तिसरी लाट आली तरी अद्यापही अनेक कर्मचारी त्यावेळी कपात केलेल्या किंवा अद्यापही न मिळालेल्या वेतनापासून वंचित राहिले आहेत.
दुसऱ्या लाटेवेळी दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्समध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली होती. आधीच कमी मनुष्यबळ असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांवर ताण असताना त्यात कोरोनाच्या संकटामुळे भर पडत गेली. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार १ हजार लोकसंख्येमागे १डॉक्टर आणि ३ नर्सेस असाव्यात पण महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यातही हे प्रमाण त्यापेक्षा खूप कमी असल्यानेच कोरोनाच्या लाटांवेळी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची उणीव जाणवते. मार्च आणि एप्रिलमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर भीतीपोटी अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना जिवावर उदार होऊनच कोरोनाचा सामना करावा लागला होता. मात्र, त्यांना त्या प्रमाणात परतावा मिळाला नाही.
उर्वरित पगार कधी मिळणार?
पहिल्या लाटेनंतरच्या काळात अनेक लहान हॉस्पिटल्सनी त्यांच्याकडील कोविडची आरोग्य सुविधा बंद केली. घटलेले उत्पन्न आणि पुढची शाश्वती नसल्याने या हॉस्पिटल्सने निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले. त्यामुळे जेव्हा दुसऱ्या लाटेवेळी हॉस्पिटल्स पुन्हा सुरू झाली तेव्हा मनुष्यबळाची कमतरता भासू लागली. त्याचा परिणाम असा झाला की नर्सेस, वाॅर्डबॉय, लॅब तंत्रज्ञ, सफाई कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या काळात जास्त वेळ आणि अपूर्ण सुरक्षा उपकरणांशिवाय काम करावे लागले होते. मात्र, दुसरी लाट संपल्यावर अनेक कर्मचारी, कामगारांना त्याचा योग्य मोबदला मिळालाच नाही. त्यांनी अनेकदा फॉलोअप घेऊनही तो मिळाला नसल्याने तो कधी मिळणार, असाच त्यांचा सवाल आहे.