ग्रामीण रुग्णालय दाभाडीसह प्राथमिक आरोग्य केंद्र वडनेर खाकुर्डीं येथे आजतागायत कोरोना प्रतिबंध लसीकरण केंद्र कार्यान्वित असून, बुधवार, १० फेब्रुवारीपासून प्राथमिक आरोग्य केंद्र सौंदाणे, निमगाव, कळवाडी, चिखलओहोळ, वडनेर खाकुर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना काळात काम केलेल्या ग्रामविकासातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी लसीकरणास सुरुवात झाली आहे. ग्रामीण रुग्णालय दाभाडी येथे नियमित, तर प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत दर बुधवारी लसीकरणाचे कामकाज करण्यात येणार आहे. नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती ग्रामीण रुग्णालय दाभाडी येथे डॉ. निर्मलकुमार जगदाळे, प्राथमिक आरोग्य केंद्र वडनेर येथे डॉ. दीपक निकम, चिखलओहोळ येथे डॉ. निवेदिता खैरनार, कळवाडी येथे डॉ. संदीप पाचपुते, निमगांव येथे डॉ. माधुरी शिंदे, तर सौंदाणे येथे डॉ. सव्यसाची गवारे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आजपासून सुरू करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणाचा प्रारंभ फ्रंटलाईन वर्कर कोविड कक्षातील परिचर मीनल रमेश शिंदे यांच्या हस्ते सौंदाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आला आहे. ग्रामविकास विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी ज्यांची लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली आहे त्यांनी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दर बुधवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत उपस्थित राहून लसीकरण करून घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम यांनी केले आहे.