नाशिक महापालिकेच्या केंद्रांवर १६ जानेवारी २०२१ ला कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. शहरातील १८ वर्षांवरील अपेक्षित लाभार्थींपैकी ९५ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर ७४ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस देऊन लसीकरण पूर्ण झाले आहे. ४ रुग्णालय व ३० शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही मोहीम राबवली जात आहे. तसेच मागणीनुसार शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन लसीकरण केले जात आहे.
लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी महापालिकेकडून विविध उपक्रम राबवले जात आहे. दरम्यान, अपेक्षित लाभार्थींपैकी ५ टक्के नागरिकांनी अद्याप पहिला डोस घेतलेला नाही, अशा नागरिकांनी तत्काळ डोस घ्यावा. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले असतील तर त्यांनी दुसरा डोस घ्यावा. ज्यांनी कोव्हॅक्सिन घेतली आहे त्यांनी २८ दिवसांनंतर दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.