नाशिक - मालेगाव आणि नाशिक महापालिका क्षेत्रात लसीकरण वाढविण्यास पुरेसा वाव असताना ही पहिला आणि दुसरा डोस पुरेसा होऊ शकला नसल्याने पुढील आठ दिवसात लसीकरण ९० टक्के करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पुढील तीन दिवसात कुणी सुटी घेतली नाही तर उदिष्टपूर्ती होऊ शकेल असे त्यांनी सांगितले.
जागतिक लसीकरण दिनानिमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील लसीकरणाचा आढावा घेतला. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, लसीकरण घटना व्यवस्थापक गणेश मिसाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील अहेर, मालेगाव आयुक्त भा.व. गोसावी, माता बालसंगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये यांच्यासह आराेग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी महानगरपालिका, नगरपालिका, आराेग्य केंद्रे येथील लसीकरणाचा आढावा घेतला. नगरपालिका क्षेत्रातील पहिला डोस ९० टक्के पेक्षा जास्त व दुसरा डोस ७० टक्के पेक्षा जास्त करण्यासाठी पुढील आठ दिवसात नियोजन करण्यात येऊन कार्यप्रणाली सुरु करण्याबाबत चर्चा केली. ज्या प्राथमिक आराेग्य केंद्रांमध्ये पहिला आणि दुसरा डोस पूर्ण झाला असेल तेथील मनुष्यबळाचा वापर करून ज्या केंद्रांवर लसीकरण अपूर्ण आहे तेथे मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
नाशिक व मालेगाव महानगरपालिका यांना लसीकरण वाढविण्यासाठी मोठा वाव असताना मालेगावात अजूनही पुरेसे लसीकरण झालेले नसल्याने या ज्या ठिकाणी केंद्रे वाढविण्याची संधी आहे अशा ठिकाणी लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. १५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सत्रे आयाेजित करणे अपेक्षित आहे. पहिला डोस ९० टक्के पेक्षा जास्त होण्यासाठी नियोजन करण्यासाठी आठ दिवसांचा कार्यक्रम आखण्याच्या सूचना गंगाथरन डी यांनी केल्या आहेत.
शाळेतच लसीकरण
१२ ते १४ वयोगटातील लसीकरण सुरू करण्याचे आदेश जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. त्याप्रमाणे शाळेतच लसीकरणाचे सत्र सुरू करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शिक्षक, पालक समिती बरोबर चर्चा करून शाळांनी लसीकरण सत्रांचे आयोजन करण्याचेही आवाहन त्यांनी केले.
पुढील आठ दिवस महत्त्वाचे
जिल्ह्यातून बाहेर गेलेले लाभार्थी सणासाठी नाशिकमध्ये येतील तेव्हा त्यांचेही लसीकरण करणे सोपे होणार आहे. यासाठी पुढील तीन दिवस महत्त्वाचे आहे. या दिवसात सुटी न घेत लसीकरण कार्यक्रम सुरूच ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले.