नाशिक : कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असताना नाशिक जिल्ह्यात गेल्या १० तारखेपासून बाधितांची संख्या वाढल्याने चिंता वाढली आहे. ही संख्या का वाढली याचा अभ्यास करण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहेत. मात्र नागरिकांकडून आरोग्य नियमांचे पालनच होत नसल्याचे सकृतदर्शनी दिसते आहे, असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. कोरोना प्रतिबंधक लसीकरण दहा मार्चपासून सुरू होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
नाशिक जिल्ह्यातील काेरोना स्थितीचा आढावा शनिवारी (दि.१३) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाशिकमध्ये शासकीय लॅबमध्ये कोरोनाची चाचणी केली तर त्यात बाधित असल्याचे अहवालाची सरासरी ५ ते ७ टक्के आहे. मात्र, खासगी लॅबमध्ये हीच सरासरी २८ टक्के इतकी आहे. म्हणजेच खासगी लॅबमध्ये बाधित असल्याचे प्रमाण अधिक आढळते आहे. त्यामुळे यासंदर्भातदेखील अभ्यास करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे भुजबळ म्हणाले. ज्या रुग्णांचे नमुने खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आहेत, त्यांची शासकीय लॅबमध्येदेखील तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना नियंत्रणात आला असे वाटत असताना प्रत्यक्षात मात्र, आठ ते दहा दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढत असून सरासरी शंभर बाधित आढळू लागले आहेत. नाशिकच नव्हे तर मुंबई आणि नागपूर अन्य शहरातदेखील बाधितांची संख्या वाढत आहे. विदेशातही पुन्हा लॉकडाऊन होत आहे. तशी वेळ येऊ नये यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचे पालन करण्याचे आवश्यक आहे, परंतु सध्या लग्नसोहळे किंवा हॉटेलमध्ये गर्दी करताना अशा प्रकारच्या नियमांचे पालन आढळत नाहीत असेही भुजबळ म्हणाले.