नाशिक : येत्या १० जानेवारीपासून फ्रंटलाईन्स वर्कर्स आणि इतर गंभीर आजारांचा सामना करणाऱ्या ६० वर्षांवरील नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, अतिरिक्त डोस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पहिला डोस घेतलेल्यांची संख्या जिल्ह्यात ६ लाखांहून अधिक आहे. मात्र, बुस्टर डोस सोडा अजून पहिला डोस न घेतलेल्यांची संख्यादेखील दीड लाखांहून अधिक असल्याने सर्व ज्येष्ठांनी अद्याप पहिला डोस घेण्याचीच गरज आहे.
जगभरात कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंता आणखी वाढवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातही अधिक प्रमाणात दक्षता घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्याशिवाय १० जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स आणि इतर गंभीर आजारांचा सामना करणाऱ्या ६० वर्षांवरील नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, अतिरिक्त डोस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, त्यातील सुमारे वीस टक्क्यांपर्यंतच्या ज्येष्ठांनी अद्याप पहिला डोसच घेतलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर प्रीकॉशन डोसचे स्वागत असले तरी पहिला डोसच न घेतलेल्यांपर्यंत डोस कसा पोहोचवायचा, त्याची चिंता प्रशासनाला आणि आरोग्य विभागाला पडली आहे.
निम्म्याहून अधिक ज्येष्ठ घेऊ शकतील बुस्टर
जिल्ह्यात आतापर्यंत पावणेचार लाखांहून अधिक ज्येष्ठांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. त्यामुळे त्यातील निम्म्याहून अधिक अर्थात सुमारे दोन लाख ज्येष्ठ नागरिक प्रीकॉशन डोस घेऊ शकतात. मात्र, आता या डोससाठीही रांगा लावाव्या लागल्यास ज्येष्ठ हे बुस्टर डोस कितपत घेतील, त्याबाबत प्रशासन साशंक आहे.
हेल्थ वर्कर निश्चित घेणार
जिल्ह्यात आतापर्यंत पावणेदोन लाख आरोग्य आणि अन्य फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतलेला आहे. त्यांनादेखील बुस्टर डोस घेण्यासाठी प्रोत्साहीत केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांच्यापैकी बहुतांश कर्मचारी हा बुस्टर डोस घेऊन स्वत:च्या सुरक्षिततेचे जाळे अधिक भक्कम करण्याची शक्यता आहे.
१५ ते १८मधील दोन लाखांहून अधिक युवक घेतील लस
जिल्ह्यात १८ वर्षांखालील वयोगटाचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या सुमारे एक पंचमांश आहे. त्यातही १५ ते १८ वयोगटातील युवक - युवतींची संख्या २ लाखांहून अधिक असल्याने त्या वयोगटातील प्रत्येक जण लस घेतील. हे लक्षात घेऊनच जिल्हा प्रशासनाला लसीकरणाचे नियोजन करावे लागणार आहे.