मनमाड - ३१ डिसेंबर २०२१ रोजी सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टीचे बेत आखले जात असतानाच शासनाकडून आलेल्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पाच लोकांसमवेतच नववर्षाचे स्वागत करावे लागणार आहे.
कोरोना विषाणूचा नवा प्रकार ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव सध्या राज्यात डोकेदुखी ठरत असल्याने त्याला आळा घालण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य शासनाने काही सुधारित निर्बंध घालून दिले असून, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कडक सूचना जिल्हा प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. शासनाकडून आलेल्या सूचनेनुसार, जिल्हा प्रशासनाने अंमलबजावणी सुरू केली असून, त्यानुसार रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. शनिवार (दि. २५)पासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केले आहेत. जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात शनिवार, २५ डिसेंबरपासून रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४नुसार जमावबंदी आदेश लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर, आस्थापनेवर दंडात्मक कारवाई करण्याच्या कडक सूचना आहेत.
शेत-शिवारात आयोजन
राज्य सरकारने ‘नाईट कर्फ्यू’चा निर्णय घेतल्यामुळे सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे जल्लोशी स्वागत कसे करावे, असा प्रश्न तरुणांना पडला आहे. त्यामुळे यंदा मनमाडकरांनी नववर्षाचे स्वागत शेत-शिवारात तसेच गोव्यात जाऊन करण्याचा बेत आखला आहे. ग्रामीण भागातील फार्म हाऊसलाही मागणी वाढली आहे. नववर्ष स्वागताच्या नावाखाली नशेत बेदरकारपणे गाड्या चालविणाऱ्यांना रोखण्यासाठी मनमाड शहर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. थर्टीफर्स्टला शहरात अनुचित प्रकार रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभारी निरीक्षकांनी दिली.
तारेवरची कसरत होणार
नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तसेच त्र्यंबकेश्वर ते अंबोली रस्त्यावरील हॉटेल्स ‘थर्टीफर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर विद्युत रोषणाईने सजली असली, तरी जमावबंदीच्या आदेशामुळे तरुणाईचा हिरमोड झाला आहे. एकीकडे थर्टीफर्स्टचा आनंद, दुसरीकडे कायद्याचा बडगा तर तिसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तथा ओमायक्राॅनची भीती यामुळे हाॅटेल व्यावसायिक, पार्ट्यांचा आनंद घेणारे नागरिक व पोलीस यंत्रणा यांची तारेवरची कसरत बघायला मिळणार आहे.