नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दोन दिवसापासून घट होत असली तरी मृतांची संख्या मात्र वाढताना दिसत आहे. सोमवारी (दि. ३१) जिल्ह्यात १ हजार ४९० बाधितांची नोंद झाली. यात शहरातील ६९०, ग्रामीण भागातील ७५०, मालेगावी १५ तर जिल्हाबाह्य ३५ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान दिवसभरात सहा जणांचा बळी गेला.
कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवार(दि. ३०)पासून मोठी घट झाली आहे. सरासरी अडीच हजारावर असलेली बाधितांची संख्या रविवारी ९५७ पर्यंत खाली येऊन ५ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सोमवारी १ हजार ४९० रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या कमी होत असल्याने ही दिलासादायक बाब असली तरी दिवसभरात नाशिक शहरात ३, मालेगावी २ तर ग्रामीण भागातील २ रुग्णांचा मृत्यू झाला. मागील चार दिवसापासून मृतांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या ८ हजार ८१२ वर पोहचली आहे. सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात १४ हजार ८४८ सक्रिय रुग्ण होते. यातील १२८ रुग्ण ऑक्सिजनवर तर, २४ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.