नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण घटत असताना गर्भवती महिलांमधील कोरोनाचे प्रमाण तर गत महिन्यापासून संपुष्टात आले आहे. त्यामुळे कोरोनाबाधित गर्भवतींसाठी सज्ज ठेवलेला जिल्हा रुग्णालय कक्षातील सर्व बेड महिन्याभरापासून रिक्त आहेत.
गत नऊ महिन्यांत कोरोनाबाधित १०३ महिलांची डिलिव्हरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या गंभीर रुग्णांप्रमाणे कोरोनाबाधित गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षामध्ये एप्रिलपासूनच्या गत ९ महिन्यांत दाखल झालेल्या १०३ कोरोनाबाधित महिलांची प्रसूती सुखरूपपणे करण्यात आली आहे. त्यात ६१ महिलांची नॉर्मल तर ४२ महिलांची सिझर डिलिव्हरी करण्यात आली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधेसाठी त्यांची कोरोना चाचणी करून घेण्यात येत आहे. त्यात कोरोना चाचणीत बाधित आढळणाऱ्या महिलांसाठी जिल्हा रुग्णालयातच स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला असून, त्यात तब्बल २० बेड ठेवण्यात आले आहेत. तिथे आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या विशेष कक्षात दाखल होणाऱ्या गर्भवती कोरोनाबाधित महिलांसाठी तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, तसेच अन्य सर्व स्टाफचीही स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या दोन महिन्यांमध्ये तर काही दिवस हे २० बेड्सही अपुरे पडण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. कक्षातील स्टाफने सर्व परिस्थिती अत्यंत प्रभावीपणे हाताळल्यामुळेच त्या स्थितीतही सर्व महिला कोरोनामुक्त होण्यासह त्यांची बालकेही निरोगी जन्माला आली. त्यामुळे या सर्व बाधित महिलांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉयचे आभार मानून या सेवेबद्दल ऋण व्यक्त केले. नूतन वर्षात शनिवारी एकमेव बाधित महिला या दालनात दाखल झाली आहे. मात्र, सदर महिलेची परिस्थितीही सामान्य असल्याने ती कोरोनामुक्त होण्यासह प्रसूतीही सामान्य होण्याची चिन्हे आहेत.
इन्फो
सर्व बालके-माता सुरक्षित
या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने अत्यंत प्रभावीपणे काम केल्यामुळेच गत ९ महिन्यांत १०३ कोरोनाबाधित महिला दाखल झाल्या. त्यातील दोन अपवाद वगळता अन्य सर्व महिला सुखरूपपणे प्रसूत झाल्या. विशेष म्हणजे, या १०३ महिलांची बाळेही सुखरूप आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची कोरोनाची बाधा आढळून आली नसल्याचे स्त्रीरोग विभागाचे तज्ज्ञ डॉ.योगेश गोसावी यांनी सांगितले.