नाशिक : कोरोना संसर्ग झाल्यानंतर गंभीर रुग्णांवर उपचारासाठी देण्यात
येणारी रेमडेसिविर आणि स्टेरॉडईसमुळे फायदा होत असल्याचे वैद्यकीय
क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे असले तरी त्यातून काही प्रमाणात साईड
इफेक्ट्स होत असल्याचे आढळत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या औषधांचे डोस
देताना काळजी घेण्याची गरज आहेच, परंतु तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच
अशा प्रकारचे डोस देण्याची गरज आहे.
सध्या कोरोनावर कोणत्याही प्रकारचे अधिकृत उपचार नसल्याने बाधितांवर
उपचार करताना गरजेनुसार डॉक्टर औषधांचे पर्याय वापरतात. कोरोना संसर्ग
झाल्यानंतर उपचारासाठी दाखल रुग्णाचा ताप चार ते पाच दिवस कमी झाला नाही
आणि एचआरसीटी स्कोर वाढला की, रुग्णाचे गंभीर रुग्णात रूपांतर होते.
संसर्ग वाढत जाऊन फुफ्फुसाला त्रास होतो. त्यामुळे श्वास घेण्यास
कठीण होते. अशावेळी ऑक्सिजन देण्याची गरज भासते. सामान्यत: अशावेळी
उपचार करणारे डॉक्टर्स रेमडेसिविरचे इंजेक्शन्स सुरू करतात. त्यातही आणखी
स्थिती गंभीर झाल्यास स्टेराईड्सचा सहज वापर केला जातो. त्यामुळे रुग्णाची
प्रकृती सुधारते आणि तो कोरोनामुक्तदेखील होतो. परंतु नंतर मात्र
अशक्तपणा आणि अन्य साईड इफेक्ट्सला सामोरे जावे लागते. मधुमेह असणाऱ्या
अनेकांना तर साईड इफेक्ट म्हणून म्युकरमायकोसिस म्हणजे एक प्रकारचा
फंगल इन्फेक्शनचा त्रास होऊ शकतो. त्यातून काहींना डोळे गमवावे लागल्याचे
देखील प्रकार घडले आहेत. अर्थात एकूण कोरोना बाधितांच्या तुलनेत हे
प्रमाण कमी असले तरी काळजी घेण्याची गरज आहे. विशेषत: रेमडेसिविर
इंजेक्शन्स किंवा स्टेरॉइड्सचा वापर योग्य वेळी आणि तज्ज्ञांकडून झाला
पाहिजे. रुग्णांवर उपचार असताना शुगरवर लक्ष देण्याची गरज आहे.
इन्फो...
काय होतात परिणाम
रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्याने अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. सध्या
यातील म्युकरमायकोसिस हा त्रास होत असल्याचे नाशिकमध्येदेखील आढळले
आहे. बुरशीजन्य आजारामुळे डोळे, नाक, दात, मूत्रपिंड इतकेच नव्हे; तर
मेंदूपर्यंत परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या उपचाराने तातडीने बुरशी
काढून रुग्णाला सुरक्षित ठेवता येते. मात्र, नाकातून रक्त, नाकाजवळ काळे
डाग किंवा अन्य आजार वाढू शकतात.
कोट...
सध्या कोरोना बाधितांवर उपचारासाठी रेमडेसिविर तसेच स्टेराईडचा वापर केला
जातो. ज्यांना मधुमेह आहे, अशांवर अशा औषध आणि इंजेक्शन्सचे साईड इफेक्ट
जाणवत असताना उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी शुगरकडे लक्ष दिले पाहिजे.
त्यानंतर कोरोनामुक्त झालेल्यांनीदेखील नाकातून रक्त किंवा नाकाजवळ काळे
डाग यांसारखे काहीही आढळल्यास तत्काळ डॉक्टरांंशी संपर्क साधावा.
- डॉ. शिरीष देशपाडे, एम. डी.
कोट...
रुग्णांवर उपचार करताना देण्यात येणाऱ्या काही इंजेक्शनमुळे कोरोनामुक्त
झालेल्यांना म्युकरमायकोसिस अशा प्रकारचे आजार होत आहेत. खासगी वैद्यकीय
व्यावसायिकांकडे असे अनेक रूग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे काळजी घेण्याची
गरज आहे.
- डॉ. शब्बीर इंदोरवाला, इएनटी स्पेशालिस्ट
इन्फो...
रेमडेसिविरचे साईड इफेक्ट्स
रेमडेसिविर इंजेक्शन साधारणत: पाच ते सात इंजेक्शन टप्प्याने दिली
जातात. त्यामुळे कोरोनामुक्त होऊन रुग्ण घरी गेल्यानंतर रुग्णाला तीन
आठवडे अत्यंत अशक्तपणा जाणवू शकतो. तसेच प्रतिकारशक्ती कमी होते.
त्यामुळे काविळ होऊ शकते. तसेच मुत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर कमी अधिक
परिणाम होऊ शकतो. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी तसेच अनेक
ठिकाणी शासकीय पोस्ट कोविड सेंटर्स किंवा अन्य तज्ज्ञ वैद्यकीय
व्यावसायिकांचा सल्ला घ्यावा.
इन्फो...
स्टेरॉईड्सचे साईड इफेक्ट
कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉईड्समुळे अनेक
रुग्णांना म्युकरमायकोसिस झाल्याचे समोेर आले आहे. इएनटी
स्पेशालिस्टकडे अशा प्रकारचे रुग्ण दाखल होत आहेत. बुरशीजन्य आजारामुळे
काही रुग्णांचे डोळे काढून टाकावे लागले आहेत. पूर्वी वर्षभरात दोन ते
चार अशा प्रकारचे रुग्ण आढळत असत. आता ते दिवसाला दोन ते तीन रुग्ण आढळत
असल्याचे खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सांगितले.