नाशिक- महत्प्रयासानंतर नाशिक महापालिकेच्या बस सेवेसाठी राज्य शासनाकडून रखडलेला परवाना अखेर मिळला असला तरी शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्याने तूर्तास महापालिकेनेच जरा ब्रेक घेण्याचे ठरवले आहे. सुरक्षीत अंतराचा फज्जा उडणार असेल आणि शहरातील बाधीतांची संख्या वाढणार असेल तर बस सुरू करून काय उपयोग असा प्रश्न भाजपाने केला आहे.
नाशिक महापालिकेच्या वतीने नाशिक महानगर परीवहन महामंडळ बस सेवा सुरू करण्यास तयार आहे. मात्र एकेक अडथळे येत आहेत. त्या दूर करून प्रजासत्ताक दिनी सेवा सुरू करण्याची तयारी करण्यात आली असताना बस परवानाच उपलब्ध नसल्याचे प्रकरण पुढे आले. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्य शासनाच्या परीवहन मंत्रालयाकडे बस चालवण्यास परवाना मिळावा म्हणून महापालिकेने अर्ज केला होता.
मात्र, त्यानंतर वारंवार स्मरणपत्र देऊनही परवाना मिळाला नव्हता. दरम्यान, महापौर सतीश कुलकणी यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या्कडे तर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर अखेरीस गेल्या १८ फेब्रुवारीस हा परवाना मंजुर करण्यात आला आहे. त्यानंतर परवान्यासह सर्व माहिती आणि विशेषत: तिकीट दर निश्चीतीसाठी प्रादेशिक परीवहन प्राधीकरणाकडे अर्ज करण्यात येणार आहे. या प्रकीयेला दहा ते पंधरा दिवस लागु शकतात. मात्र, त्यानंतरही शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधीतांची संख्या वाढु लागल्याने अडचण झाली आहे.लॉक डाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर नागरीकांकडून सुरक्षा नियमांचे पालन न झाल्याने कोरोना संसर्ग वाढु लागला आहे त्यामुळे आरोग्य नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासनाला कारवाईचा बडगा उगारावा लागत आहे. अशावेळी बस सेवा सुरू करणे कठीण असून त्यातून संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरटीएची परवानगी मिळाली तरी अशप्रकारे बस सेवा सुरू करण्याची तयारी नसल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.आरोग्य नियमांचे पालन होत नसल्याने शहरात कोरोना वाढत आहे. त्यातच बस सुरू केल्यावर फिजीकल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे योग्य वेळी बस सेवेचा निर्णय होऊ शकेल.- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका.