नाशिक : शहरातदेखील कोरोना आजाराचा फैलाव आता वेग धरू लागला आहे. शुक्रवारी महापालिका हद्दीतील जुने नाशिक, गोसावीवाडी, नाशिकरोड आणि दसक-पंचक जेलरोड या भागात तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. यानंतर आज मंगळवारी (दि.१९) दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या वडाळा गावठाणमधील रजा चौकभागातील आलिशान सोसायटीमधील एक ४५वर्षीय पुरूष कोरोनाबाधित आढळून आला आहे. यामुळे आता महापालिका प्रशासनाने हा संपुर्ण परिसर ‘कन्टेन्मेंट झोन’ करण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. सुदैवाने मागील आठवडाभरापासून ही कोरोनाबाधित व्यक्ती जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना कक्षात उपचारार्थ दाखल असल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिली. मनपा हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या आता ४८ वर पोहचली आहे.शहराचा गावठाण व अत्यंत दाट लोकवस्तीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिकनंतर आता वडाळागावातदेखील कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे आता परिस्थिती गंभीर बनत चालली असून नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. वडाळागाव परिसरात सुरूवातीपासूनच काही प्रमाणात लॉकडाउनबाबत उदासिनता दिसून येत होती. सुरूवातीला रजा चौकात भरणाºया भाजीबाजारात ‘डिस्टन्स’चे तीनतेरा झालेले दिसून आले. यामुळे येथून हा भाजीबाजार महापालिका व पोलीस प्रशासनाने थेट वडाळा चौफुलीजवळील मोकळ्या पटांगणात हलविला. त्यानंतर पंधरा दिवसांनी रजा चौक भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आता परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. या परिसराकडे जाणारे सर्व रस्ते सील केले गेले आहे. तसेच वडाळागावात येणारा मुख्य रस्तादेखील जामा गौसिया मशिदीपासूनच बंद करण्यात आला आहे. एकूणच खंडेराव महाराज चौक, वडाळा पोलीस चौकी, जय मल्हार कॉलनी, रजा चौक, झिनतनगर, गणेशनगर हा सगळा परिसर आलिशान सोसायटीपासून अगदी जवळ आहे. यामुळे हे संपुर्ण क्षेत्र प्रतिबंधित झोन म्हणून सील केले आहे.सकाळी अकरा वाजेपासूनच इंदिरानगर पोलीसांचा फौजफाटा, मनपा शहरी आरोग्य विभागाचे पथक, तीन रुग्णवाहिका, जंतुनाशक फवारणी करणारे ट्रॅक्टर, कर्मचारी असा सगळा लवाजमा रजा चौकात येऊन धडकला. या संपुर्ण भागात पोलिसांकडून उद्घोषणा करण्यास सुरूवात झाली. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक गरज असल्यास तोंडाला मास्क लावून परस्परांमधील अंतर राखून घराबाहेर पडावे, तत्काळ काम आटोपून पुन्हा घरात जावे, लहान मुले, वृध्द व्यक्तींची अधिकाधिक काळजी घ्यावी, घरातदेखील वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ धुवावीत अशा विविध सुचना ध्वनीक्षेपकावरून संपुर्ण परिसरात दिल्या जात होत्या.या भागातील संपुर्ण गल्लीबोळात काही वेळेतच शुकशुकाट दिसून आला. नागरिकांनी आपआपल्या घरांमध्ये बसणे पसंत केले. यामुळे रस्ते ओस पडले होते.दरम्यान, आलिशान सोसायटीमधील संबंधित कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबातील काही लोकांनाही रुग्णवाहिकेतून क्वारंटाइन सेंटरला हलविण्यात आले आहे.जुने नाशिक, वडाळागाव दाट लोकवस्तीत कोरोनाने प्रवेश करू नये, असे प्रत्येक नाशिककराला वाटत होते; मात्र सातपूर येथील त्या कोरोनाबाधित महिलेच्या संपकर् ात आलेली कुंभारवाड्यात राहणारी एक महिला जुन्या नाशकात कोरोनाबाधित आढळून आली. त्यानंतर पिंपळगाव बसवंत ते मुंबई या मार्गावर ट्रकमधून कांदा वाहून नेणारा व वडाळागावात राहणारा ट्रकचालकदेखील पॉझिटिव्ह आल्याने भीती व्यक्त होत आहे.