नाशिक : कोरोनाच्या भयानक उद्रेकासह बळींच्या वाढत जाणाऱ्या आकड्याने मंगळवारी (दि. ६) आतापर्यंतच्या एकाच दिवसातील बळींचा उच्चांक गाठला आहे. मंगळवारी तब्बल ३२ बळींची नोंद झाली असून, गतवर्षाच्या सर्वाधिक बळींपेक्षाही हा आकडा दोनने अधिक आहे. दरम्यान, बाधित संख्येने ४,६३८ पर्यंत मजल मारली असून, एकूण ३,१९१ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये २,८९४, तर नाशिक ग्रामीणला १,५४३ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ११९ व जिल्हाबाह्य ८२ रुग्ण बाधित आहेत. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ११, ग्रामीणला १६, तर मालेगावला ३ आणि जिल्हाबाह्य २, असा एकूण ३२ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणेसमोरदेखील बळी रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गत पंधरवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने तीन हजार आणि चार हजारांवर राहिल्यानंतर पुन्हा बाधित संख्येची वाटचाल पाच हजारांच्या दिशेने सुरू झाली आहे. गतवर्षापेक्षा २ अधिक जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या बरोबरीने मृत्यूदराचीही वाटचाल उच्चांकाकडे होऊ लागली आहे. गतवर्षी ६ ऑगस्टला ३० तर १६ सप्टेंबरला २९ इतक्या सर्वोच्च बळींची नोंद जिल्ह्यात झाली होती. मात्र, गतवर्षीच्या सर्वाधिक बळींपेक्षाही २ अधिक बळी मंगळवारी नोंदले गेल्याने ही बळींची वाढच जिल्ह्यासाठी घातक ठरण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, प्रलंबित अहवालाची संख्या पुन्हा एकदा सहा हजारांवर अर्थात ६,७९२ वर पोहोचली आहे.ग्रामीणचे बळी शहरापेक्षा अधिक जिल्ह्यातील ३२ बळींपैकी तब्बल निम्मे म्हणजे १६ बळी हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नोंदले गेले आहेत. हे बळी शहरातील बळींपेक्षाही अधिक आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातदेखील बळींचे तांडव सुरू झाल्याने आरोग्य विभागाला आता ग्रामीण भागावरदेखील अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे. एकूण मृत्यूसंख्या अडीच हजाराचा आकडा ओलांडून २,५२९ पर्यंत पोहोचली आहे.
उपचारार्थी ३२ हजारांवर जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्यादेखील सर्वाधिक स्तरावर असून, सध्या ३२ हजार १६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात नाशिक महापालिका क्षेत्रात १९ हजार २५६, नाशिक ग्रामीणला १० हजार ५२७, मालेगाव मनपाला २,१३४ तर जिल्हाबाह्य २५१ रुग्णांचा त्यात समावेश आहे.