नाशिक : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची गती अत्यंत धिमी असल्याने एक तृतीयांश नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्यासदेखील वर्षभराहून अधिक कालावधी लागण्याची चिन्हे आहेत. एकीकडे कोरोना भयावह वेगाने मुसंडी मारत असताना लसीकरणाची कासवगती ही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत क्लेशदायक ठरत आहे.
राज्याकडे कोरोना लसीचे पुरेसे डोस नाहीत ही वस्तुस्थिती सातत्याने उघड होत आहे. त्यामुळेच कधी ज्येष्ठांना लस, कधी केवळ युवांना लस तर कधी लसीकरण ठप्प अशा प्रकारे लसीकरणाचे कामकाज संथ गतीने सुरू आहे. त्याच वेगाने कोरोना लसीकरण सुरू राहिले, तर आपल्याला लस कधी मिळणार, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना लसीकरण धिम्या गतीने केल्यास पुन्हा एकदा लसीकरण मोहीम राबवावी लागेल का, कोरोना व्हायरसने गुणधर्म बदलल्यास लसीमध्ये बदल करावे लागतील का, त्याच गतीने लसीकरण सुरू राहिल्यास तुम्हा-आम्हाला लस मिळायला किती वर्षे लागतील, हे कुणीही सांगू शकत नाही. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत असताना कोरोनावर लस कधी येणार, असा प्रश्न लोक उपस्थित करत होते. राज्यात कोरोनाचे आकडे वाढत आहेत. त्यामुळे आपल्या राज्यात लसीकरणाचा वेग कमी आहे का, राज्यात कोरोना रुग्ण वाढीची काय कारणे आहेत, जर लसीकरणाचा वेग अधिक असेल तर कोरोनाचे आकडे वाढण्याची कारणे काय, कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये आणि दुसऱ्या लाटेमध्ये मोठा फरक पाहायला मिळत आहे. कारण पहिल्या लाटेमध्ये आपल्याकडे लस नव्हती. मात्र, दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याकडे कोरोनाची लस आहे. दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याकडे कोरोनाची लस असतानाही राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्य शासनाच्या माहितीनुसार १२ कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ दोन ते तीन टक्के नागरिकांच्या दोन्ही लस घेऊन झाल्या आहेत. राज्याने केंद्र सरकारकडे दर आठवड्याला २० लाख कोरोना लसीची मागणी केली.
इन्फो
सर्व टप्पे कधी पूर्ण होणार?
महाराष्ट्राने दररोज ३ लाख लोकांना लस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. प्रारंभी कोविड योद्ध्यांना राज्यात लस देण्याचे ठरले, तर दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षावरील तसेच ज्या लोकांना गंभीर आजार आहेत अशा ४५ वर्षावरील लोकांना लस दिली देण्यात आली. तर १ मेपासून १८ वर्षावरील सर्व सज्ञान नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात कोविड योद्ध्यांना लस देण्यास प्रारंभ करूनही त्यांचेदेखील सर्वांचे दोन्ही डोस अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यात अजून १८ वर्षाखालील युवा आणि बालकांना लसी कधी मिळणार, ते समजू शकलेले नाही.
इन्फो
कालावधीबाबत अनिश्चितता
१२ कोटी जनतेपैकी दररोज ३ लाख लोकांना कोरोनाची लस दिली जाते. असे गृहीत धरले तरी सध्याच्या वेगाने साधारणपणे दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र, सरकार सरसकट लसीकरण करत नसल्याने पहिला टप्पा जाहीर झाल्यानंतर दुसरा टप्पा, दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर तिसरा टप्पा असे लसीकरणाचे टप्पे केले जात आहे. आणि ठरावीक वयातील लोकांना आजार पाहून लसीकरण केले जात आहे. त्यामुळे राज्यात लसीकरणाच्या पूर्णत्वाला दशकातील मध्यापर्यंतची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इन्फो
खासगीतील लसीकरण ठप्पचाही परिणाम
त्यात लसी प्राप्त होण्याचे प्रमाणच कमी असल्याने नागरिकांना खासगी रुग्णालयातून मिळू शकणाऱ्या लसीदेखील बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये होणारी लसीकरणाची प्रक्रियादेखील ठप्प झाली आहे. भविष्यात जेव्हा मुबलक लस उपलब्ध होतील, तेव्हाच आता खासगीमध्ये लसीकरणाला प्रारंभ होणार असून त्यानंतरच खऱ्या अर्थाने लसीकरण वेग पकडू शकणार आहे.
------------------
(डमी)