पिंपळगाव बसवंत : आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत होणाऱ्या वाढीचा परिणाम शाळांच्या उपस्थितीवर जाणवायला लागला असून, ४० टक्के उपस्थिती घटली असल्याची परिस्थिती शाळांमध्ये दिसून येत आहे. प्रशासनाने शाळा बंदचे कोणतेही आदेश दिले नाहीत. मात्र, पालकवर्गाकडून आपल्या पाल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेत शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला जात आहे.राज्यात करोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताच शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावी आणि दुसऱ्या टप्प्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू केल्या. १५ फेब्रुवारीपासून शहरातील महाविद्यालयेही सुरू करण्यात आली. मात्र, महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी सध्यातरी पाठ फिरवली आहे. याउलट ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांतील उपस्थिती समाधानकारक आहे. मात्र, कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने शाळा प्रशासन आणि पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर दिसत आहे. त्यामुळे काही शाळांनी तोंडी सूचना देत विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. शाळेतील एखादा विद्यार्थी किंवा त्याच्या परिवारातील व्यक्तीचा कोरोना अहवाल सकारात्मक असल्यास पूर्ण शाळाच बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळा प्रशासन खबरदारी म्हणून आपला मोर्चा पुन्हा ऑनलाइन वर्गाकडे वळवेल, असे वातावरण सध्यातरी निर्माण होताना दिसत आहे. मात्र, रुग्ण वाढू नयेत व आपण आणि आपली शाळा सुरक्षित राहावी यासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थांनी शासनाने नमूद केलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे; अन्यथा पुन्हा शाळा ओस पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण शाळा सुरक्षित राहावी यासाठी शाळा प्रशासनाकडून शासनाने नमूद केलेल्या कोरोना नियमांचे काटेकोरपणे नियम पाळले जात आहेत. त्यात शाळा, वर्गखोल्या स्प्रे मारून सॅनिटाइझ करणे, माक्सचा नियमित वापर करणे, फिजिकल डिस्टन्स ठेवणे आदी सुरक्षितता राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर भर दिला जात आहे. पालकांनीही घाबरून न जाता आपल्या मुलाला कोरोनाचे नियम व्यवस्थित समजावून ते अमलात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे.
कोरोनाची धास्ती, विद्यार्थ्यांची घटली उपस्थिती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 10:17 PM
पिंपळगाव बसवंत : आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत होणाऱ्या वाढीचा परिणाम शाळांच्या उपस्थितीवर जाणवायला लागला असून, ४० टक्के उपस्थिती घटली असल्याची परिस्थिती शाळांमध्ये दिसून येत आहे. प्रशासनाने शाळा बंदचे कोणतेही आदेश दिले नाहीत. मात्र, पालकवर्गाकडून आपल्या पाल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेत शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला जात आहे.
ठळक मुद्देग्रामीण भागातील वास्तव : पालकांकडूनच खबरदारीचा उपाय