नाशिक : उत्तर महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव कमी होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. मृत्यूदर देखील १.८९ टक्के इतका खाली आला आहे. सद्यस्थितीत उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये घट होतांना दिसत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे या आकडेवारीवरून दि्सून येत असले तरी नागरिकांना अजूनही खबरदारी घ्यावी लागणार आहे. प्रशासनाकडून नागरिकांनी सुरक्षितता नियमांचे पालन करण्याबाबत सातत्याने आवाहन केले जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा यांच्या प्रयत्नांतून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. विभागातून आजपर्यंत २ लाख ६५ हजार ३५० रुग्णांपैकी २ लाख ५७ हजार ३१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ३ हजार ०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत विभागात ५ हजार ३५ रुग्णांचा मृत्यू झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९७ टक्के आहे, तर मृत्युदर १.८९ टक्के इतका आहे, अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ दिली.
नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख १३ हजार ८३० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ लाख १० हजार ४९२ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्या आले आहे. सद्यस्थितीत एक हजार ३०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०६ टक्के इतके आहे. जिल्ह्यात दोन हजार ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगांव जिल्ह्यात ५६ हजार ६६१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५४ हजार ८१२ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. सद्यस्थितीत ५०४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या जिल्ह्यात आजपर्यंत १,३४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
धुळे जिल्ह्यात १४ हजार ७०४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असले तरी १४ हजार १५३ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याचे दिलासादायक चित्र आहे. सध्या केवळ १६१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२५ टक्के इतके आहे. अहमदनगर जिल्ह्यात ७० हजार ९२३ कोरोनाबाधित रूग्ण समोर आले तर दुसरीकडे ६९,४३३ रूग्ण बरेदेखील झाले आहेत. १ हजार ८१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८९ टक्के इतके आहे.
नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत ९,२३२ पैकी ८,४२० रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. ६२४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.२० टक्के इतके आहे.
--इन्फो--
विभागात ४,३६९ होम क्वारंटाईन
नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये ११ लाख ३३ हजार ५८६ अहवाल पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २ लाख ६५ हजार ३५० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विभागात ४ हजार ३६९ व्यक्ती होम क्वारंटाईन तर २२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली..